ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या अद्यापही कायम असल्याने ठाणेकर हैराण झाले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी कचरा टाकून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचबरोबर कचऱ्याला आग लागून परिसरात धुर पसरत आहे. या त्रासामुळे शिंदेची शिवसेना आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे येथे कचरा नेणे पालिकेने बंद केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून डायघर येथील कचरा प्रकल्पही बंद आहे. यामुळे पालिकेने भिवंडीतील आतकोली भागात राज्य शासनाने कचराभुमीसाठी दिलेल्या जागेवर कचरा नेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, प्रवास कालावधी वाढल्याने दैनंदिन कचरा संकलनाचे गणित बिघडले असून यामुळे गृहसंकुलांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय, रस्त्यावरही कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाले आहेत. शहरात कचऱ्याची समस्या कायम असल्यामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी गुरुवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. तर, त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी देसाई यांनी हे आंदोलन केले. शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला.
पालिकेला इशारा
महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे. जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा सुहास देसाई यांनी यावेळी दिला.