सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील अद्यापही निकाल न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे नवीन चर्चांना तोंड फुटलं आहे. गोगावले यांनी ‘घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही’ असं मत व्यक्त केलं आहे. याच वक्तव्यावर शरद पवार यांनी ठाण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये आपलं मत मांडलं आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही असं गोगावलेंनी रत्नागितिरीत जाहीर सभेत म्हटलं. “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ,” असं भरत गोगावले म्हणाले.
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या आठावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांना गोगावलेंच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. “पुढील पाच वर्ष न्यायलयामधील पेचप्रसंग सुटणार नाही असं भाकित भरत गोगावलेंनी केलेलं आहे,” असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तसेच गोगावले हे शिंदे गटाचे आमदार असल्याचा संदर्भही पवारांना पत्रकारांनी दिला. त्यावर पवारांनी मोजक्या शब्दामध्ये. “त्यांचा सुसंवाद फारच चांगला दिसतोय. इतकी जवळीक न्याय संस्थेसंदर्भात मी कधी ऐकली नव्हती. पण याचा अर्थ काहीतरी दिसतंय,” असं उत्तर दिलं.