लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळी कट्टर समर्थक मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी नजीब मुल्ला यांचा बालेकिल्ला असलेल्या राबोडी परिसरात आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेले मुल्ला हे आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वाला अलीकडे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात आणण्यातही मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा राहिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या राबोडी भागातील निवासस्थानी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-ठाण्यात मनसेने शोरूमला काळे फासले, मराठीत पाटी नाही म्हणून मनसेचे आंदोलन

राबोडी या भागात अनेक वर्षांपासून नजीब मुल्ला हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये गटबाजीपूर्वी मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. सध्या नजीब मुल्ला अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा मुंब्रा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यांना शिंदे गटात आणण्यात मुल्ला यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. पक्षात गटबाजी निर्माण झाल्यानंतर नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टिका करत आहेत. त्यामुळे आव्हाड यांनी शरद पवार यांनाच थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात घेऊन आले. शरद पवार येणार असल्याने राबोडी, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी भागात मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. राबोडी भागात शहराध्यक्ष सुहास देसाई यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राबोडी भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

शरद पवार यांना पाहण्यासाठी भाजपचा पदाधिकारीही उपस्थित

शरद पवार हे राबोडी भागात येणार असल्याचे कळताच भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर हे देखील सुहास देसाई यांच्या निवासस्थानी आले होते. गर्दी असल्याने त्यांना पवार यांची भेट घेता आली नाही. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना पाहण्यासाठी आल्याचे विक्रम भोईर यांनी स्पष्टीकरण दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars visit to rabodi area in thane mrj
Show comments