कल्याण– माहितीच्या महाजालात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. ग्रंथ, पुस्तके ही आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत. हे विद्यार्थ्यांना कळावे. या उद्देशातून कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने ‘वाचनालय विद्यार्थ्यांच्या भेटीला’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात येथील शारदा विद्यामंदिराचे विद्यार्थी तीन दिवस सहभागी झाले होते.
सार्वजनिक वाचनालयाच्या तीन दिवसाच्या पुस्तक देवाण-घेवाण कामकाजात शारदा मंदिराचे इयत्ता आठवी आणि नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक वाचनालयात सुमारे पाच हजाराहून अधिक पुस्तके आहेत. अत्याधुनिक पध्दतीने वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. वाचनालयातील कामकाज, येथील ग्रंथसंपदेची माहिती विद्यार्थांना व्हावी म्हणून सार्वजनिक वाचनालय व्यवस्थापनाचे अध्यक्ष, सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
हेही वाचा >>> ठाणे : गावदेवी यात्रेनिमित्ताने कोपरीत वाहतूक बदल
कल्याण शहर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी वाचनालयात आणून त्यांना वाचनालय कसे चालवायचे. ग्रंथपाल, साहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथसेवक यांच्या जबाबदाऱ्या काय. वाचकांना आवडती, त्यांच्या पसंतीची पुस्तके वाचनालयाच्या ग्रंथसंपदेमधून अचूक कशी काढून द्यायची याची माहिती दिली जाते. प्रशिक्षण वाचनालय कर्मचारी विद्यार्थ्यांना देतात. त्याप्रमाणे विद्यार्थी दोन ते तीन दिवस सार्वजनिक वाचनालयाचे काम पाहतात. या कामात सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी हस्तक्षेप करत नाहीत. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागावा. जबाबदारीची जाणीव व्हावी हाही या उपक्रमामागील उद्देश आहे, असे वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी सांगितले.
शारदा विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना वाचनालयातून प्रशिक्षण देण्यात आले. हे विद्यार्थी दोन दिवस वाचनालयात ग्रंथसेवक म्हणून काम पाहत होते. शारदा मंदिराचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील, शिक्षिका भाग्यश्री ठाकूर, स्वाती पालांडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी आम्हाला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन काही शिकायला मिळाले. वाचनालयाचा कारभार कसा चालतो हे प्रत्यक्ष कृतीने पाहण्यास मिळाले, असे सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे : कापूरबावडी चौकाजवळ मोटारीला आग ; कापूरबावडी ते कोपरी पर्यंत वाहनांच्या रांगा
“विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाचनालयाची आवड निर्माण व्हावी. वाचन व्यवहार कसा असतो. आताच्या मोहात अडकविणाऱ्या समाज माध्यमापासून मुले काही काळ ग्रंथ, पुस्तकांमध्ये अडकून पडावीत हा उपक्रमामागील उद्देश आहे.”
भिकू बारस्कर सरचिटणीस, सार्वजनिक वाचनालय, कल्याण.
फोटो ओळ