ठाणे : गेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. पण, हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील मनसेच्या चौक सभेत बोलताना केली. महिलांना १५०० रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या आणि हाताला काम द्या, जेणेकरून महिलांना पैसे देण्याची गरज भासणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
ठाणे शहर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांनी गोकुळनगर भागात चौक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या ७५ वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. काही पक्षांनी देशात, राज्यात तर काही पक्षांनी पालिकेत सत्ता उपभोगली आहे. परंतु हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.
राज्याची हद्द सोडली तर सर्व रस्ते चांगले दिसून येतात. त्यामुळे आमच्या आमदार खासदारांना इतकी कसली भूक आहे की चांगले रस्ते बनवणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षी कित्येक लोक मरतात. १६ वर्ष होऊन रस्ता होऊ शकलेला. आपला ज्ञान चंद्रावर पण सोळा वर्षात पोहोचला पण, मुंबई गोवा रस्ता होऊ शकलेला नाही. आपली टेक्नॉलॉजी चंद्रावर जाण्याएवढी मजबूत आहे. परंतु हा रस्ता आपला मंगळ ग्रहावरचा असल्यामुळे तो बनू शकत नाही, असा खोचक टीकाही त्यांनी केली.
आपल्याला सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीतील घरांच्या छप्पर पडत आहे. राज्य सरकारने जर मनावर आणलं तर त्यांना इमारती बांधून चांगली घरे देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. महिलांना १५०० रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या आणि हाताला काम द्या, जेणेकरून महिलांना पैसे देण्याची गरज भासणार नाही, असेही त्या म्हणाल्या. महिलांना पंधराशे रुपये मिळाल्यामुळे त्या खुश आहेत. १५०० रुपये देत असले तरी ते महागाई वाढवून महिलांच्या घरखर्चातले ३ हजार रुपये काढून घेतात, हे महिलांना समजेपर्यंत निवडणूक होऊन गेलेली असते, अशी टीकाही त्यांनी केली.