मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, भाईंदर परिसरांत राहणाऱ्या भटक्या-विमुक्त मुलांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण करणारी ठाणे जिल्हय़ातील एकमेव आश्रमशाळा कल्याणजवळील मोहने येथे आहे. ‘समाजजागृती व सेवा संघा’तर्फे गेल्या पंचवीस वर्षांपासून ही संस्था चालवली जाते. संस्था अध्यक्ष महेंद्र मधुकर संग्रामपूरकर यांच्या मागणीवरून शासनाने ही संस्था सोलापूरमधील माळशीरस तालुक्यातील मोरोची गाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या संस्थेला शासनाकडून शंभर टक्के अनुदान संस्थेला मिळते. सध्या ४२६ विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात. २१७ विद्यार्थी निवासी तत्त्वावर शिक्षण घेतात.
सरकारच्या या निर्णयाने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईपासून कल्याणजवळ असल्याने मुलांना नियमित भेटणे शक्य होते. येण्या-जाण्याचा खर्च परवडतो. ही शाळा सोलापूरला स्थलांतरित केली, तर मुलांना भेटणे दूरच, पण प्रवासाला येणारा नियमित खर्च कसा करायचा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे त्यांनी सांगितले.  या निर्णयाने शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी नाराज आहेत. २५ वर्षे कल्याणमध्ये वास्तव्य केल्याने आता एकदम सोलापूरला स्थलांतर करणे  कठीण जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.आश्रमशाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय संस्था अध्यक्ष महेंद्र संग्रामपूरकर यांनी कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता घेतला आहे, असे समाज जागृती सेवा संघाच्या कार्यकारिणीने म्हटले आहे.
त्यामुळे विद्यार्थी, शाळा स्थलांतर, न्यायालयीन प्रकरण, कर्मचाऱ्यांचे पगार याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास अध्यक्ष जबाबदार राहतील. या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ती जबाबदारीही अध्यक्षांची असेल, असा इशारा देणारे पत्र संग्रामपूरकर यांना दिले आहे. भटक्या-विमुक्त मुलांविषयी कळवळा दाखवून संस्थेला मान्यता मिळवायची. संस्था स्थिरस्थावर झाल्यावर वैयक्तिक स्वार्थासाठी शाळा अन्य भागात स्थलांतरित करून ग्मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, ही संस्थाचालकांची मनमानी सहन करणार नाहीत, असा इशारा दिला.

सरकारची ‘कार्यतत्परता’
शाळा स्थलांतराबाबत गेल्या वर्षी जूनमध्ये संस्थेने सामाजिक न्याय विभागात प्रस्ताव सादर केला. या विभागाचे कार्यासन अधिकारी शिवाजी चौरे यांनी ऑगस्टमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून आश्रमशाळा स्थलांतराचा अध्यादेश प्रसिद्ध केला. निर्णय घेण्यास नेहमीच हात आखडता घेणारा सामाजिक न्याय विभाग आश्रमशाळेच्या बाबतीत एवढा तत्पर कसा झाला, असे प्रश्न पालक, शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत. ‘मोहने परिसरात भटक्या-विमुक्तांची लोकसंख्या कमी आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत इमारत अपुरी आहे. वर्ग खोल्यांसाठी स्वतंत्र इमारत भाडय़ाने विकत मिळत नाही. शाळेच्या ठिकाणी पूरपरिस्थिती असते. या कारणावरून ही शाळा मोहनेतून सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे’ असे अध्यादेशात म्हटले आहे.

शासनाने आश्रमशाळेच्या स्थलांतराला मंजुरी दिली आहे. हे प्रकरण शिक्षक, पालकांनी न्यायालयात नेले आहे. त्यामुळे या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही.
-महेंद्र संग्रामपूरकर, संस्था अध्यक्ष ,समाज जागृती व सेवा संघ मोहने

आश्रमशाळेच्या स्थलांतराबाबत शासनाने अध्यादेश काढला आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे.
    -उज्ज्वला सपकाळे, साहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग, ठाणे</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगवान मंडलिक, कल्याण