शिळफाटा रस्त्यावरील देसई खाडी पुलावर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलावर तुळई ठेवण्याचे काम १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत दररोज केले जाणार आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक रात्रीच्या आठ तासाच्या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>केडीएमटी बसला बेलापूर इथे लागली आग

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरणाची कामे मागील सहा वर्षापासून सुरू आहेत. या रस्त्यावरील लोढा पलावा चौका जवळील देसई खाडी जुन्या पुला जवळ नवीन उड्डाण पूल उभारणीचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. या पुलाचे खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावर तुळई ठेवण्याचे काम महामंडळाकडून हाती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे चालले महिनाभर प्रशिक्षणाला

शिळफाटा रस्त्यावरील वाहन वर्दळीचा विचार करुन दिवसा हे काम केले तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी या रस्त्यावर आणि पर्यायी रस्त्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत महामंडळाला देसई पुलावर तुळई ठेवण्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. गुरुवारी (ता.१५) रात्री ११ वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. दररोज रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत पुढील गुरुवारपर्यंत हे काम केले जाणार आहे.या कामात अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक विभागाने शिळफाटा रस्ता सात वाहतुकीसाठी बंद ठेऊन वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत.

प्रवेश बंद
कल्याण फाटा दत्त मंदिर येथून कल्याण, डोंबिवली, बदलापूरकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी रस्ता
कल्याण फाटा येथून कल्याण, डोंबिवलीकडे येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहने मुंब्रा बाह्य वळण रस्ता, खारेगाव टोल नाका येथून इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>>डोंबिवलीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचे भूमाफियांच्या विरोधात उपोषण, महिलेला घराबाहेर काढण्याचा भूमाफियांचा प्रयत्न

प्रवेश बंद
कल्याण, डोंबिवली, बदलापूरकडून कल्याण फाटाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना काटई येथील बदलापूर चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी रस्ता
ही सर्व वाहने बदलापूर चौकातून खोणी नाका, तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील. या आठ दिवसाच्या कालावधीत रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने या रस्त्यावरुन नियमित येजा करू शकणार आहेत, असे डाॅ. राठोड यांनी सांगितले. दिवसभराची वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilphata road closed during night time for eight days for the work of placing beams on desai khadi bridge amy