hilphata Road Traffic Updates : शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक (एक्सपेरिया माॅल) भागात निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कालावधीत पलावा चौक रस्ता पाच दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. अगोदरच वाहन कोंडीने गजबजलेला शिळफाटा रस्ता या बंदच्या कालावधीत आणखी कोंडीत अडकेल. हा धसका घेऊन बहुतांशी प्रवाशांनी कार्यालयीन सुट्टी, काहींनी घरातून कार्यालयीन काम सुरू केले आहे. काही प्रवाशांनी पर्यायी रस्ते मार्गाला पसंती दिल्याने शिळफाटा बंदच्या दुसऱ्या दिवशी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होती.

या रस्त्यावरील जड, अवजड वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे. मोटार, दुचाकी हलकी वाहने फक्त या रस्त्यावरून धावत आहेत. स्थानिक रहिवाशांचा विचार करून पलावा चौक हलक्या वाहनांसाठी खुला आहे. शिळफाटा रस्ता पलावा चौक भागात वाहतुकीसाठी बंद केल्याने अभूतपूर्व वाहन कोंडी होईल. या कालावधीत कार्यालयात वेळेत पोहचणे शक्य होणार नाही. नाहक या कोंडीत अडकून पडण्यापेक्षा बहुतांशी नोकरदार पुरूष, महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घरातून कार्यालयीन काम करणे, महिला अधिकाऱ्यांनी सुट्टी टाकून घरी राहणे पसंत केले आहे. काहींनी घरातून कार्यालयीन काम सुरू केले आहे. काही प्रवाशांनी आपल्या मोटार, दुचाकी वाहनाला आराम देऊन रेल्वेने इच्छित स्थळी प्रवास करणे पसंत केले आहे.

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १५० वाहतूक पोलिसांचा ताफा मुख्य रस्ता, पर्यायी आठ रस्ते मार्गावर तैनात आहे. शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा धसका घेऊन डोंबिवलीतील प्रवाशांनी माणकोली पूल मार्गे, कल्याणमधील प्रवाशांनी दुर्गाडी पूल, भिवंडी बाह्यवळण रस्तामार्गे इच्छित स्थळी जाणे पसंत केले. शिळफाटा रस्त्यावर शालेय बस सुरळीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. शिळफाटा रस्त्यालगतच्या गावांमधील धसका घेतलेल्या रहिवाशांनीही वाहतूक सुरळीत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

शिळफाटा रस्त्यावर, पर्यायी रस्ते मार्गावर वाहतूक पोलीस, सेवक, वाढीव ताफा तैनात आहे. जड, अवजड वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या सूचनेप्रमाणे प्रवाशांनी शिळफाट्यापेक्षा पर्यायी रस्ते मार्गाला अधिक पसंती द्यावी. प्रत्येकाचा प्रवास सुखकर होईल यासाठी प्रयत्नशील राहून वाहतूक विभागाला सहकार्य करावे. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.

शिळफाटा रस्त्यावरील कोंडीत अडकण्यापेक्षा पाच दिवस मी घरातून कार्यालयीन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज या रस्त्यावरून जाताना कोंडीला तोंड द्यावे लागते. या रस्त्यावरील मेट्रो, काटई पूल, रूंदीकरणाची कामे लवकर पूर्ण करावीत. – स्वाती जोशी, प्रवासी

शिळफाटा दररोज कोंडीत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे खूप हाल होतील असे वाटले होते. वाहतूक विभागाने योग्य नियोजन केले. त्यामुळे या रस्त्यावरून बंदच्या काळात वाहतूक सुरळीत आहे. – नरेश पाटील, रहिवासी, काटई

Story img Loader