Shilphata Road Traffic Updates : निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी मंगळवार रात्री बारा वाजल्यापासून शिळफाटा रस्त्याचा पलावा चौक भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने रात्रीपासून शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व कोंडीला सुरूवात झाली. बुधवारी सकाळी शिळफाटा रस्त्यावर ३० मिनिटाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत. काही प्रवाशांनी पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते अरूंद असल्याने या रस्त्यावर वाहनांचा लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पलावा चौक जड, अवजड वाहनांसाठी बंद असला तरी दुचाकी, मोटारसारख्या हलक्या वाहनांसाठी या रस्त्याची एक मार्गिका खुली राहणार असल्याची माहिती मिळाल्याने बहुतांशी प्रवाशांनी वळसा, पर्यायी रस्ते मार्गापेक्षा पलावा चौक मार्गे जाण्याला पसंती दिली. त्यामुळे एकाचवेळी दुचाकी, चारचाकी वाहने पलावा चौकाच्या दिशेने आल्याने पलावा चौकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. या रांगा देसई, खिडकाळी दिशेने तर कल्याण दिशेला काटई, मानपाडा दिशेने लागल्या आहेत.

हलके वाहन चालक प्रस्तावित केलेल्या पर्यायी रस्ते मार्गाने जाण्यास तयार नसल्याने पलावा चौक, त्याच्या बाजुला उड्डाण पूल कोंडीत अडकला. हलक्या वाहन चालकांनी शिळफाटा रस्त्यावर काटई चौक येथे डावे वळण घेऊन खोणी तळोजा मार्गे नवी मुंबई दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाईपलाईन रस्त्यावर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर दिशेने आलेल्या वाहनांच्या काटई चौक दिशेने रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या वाहनांना खोणी येथे वळण घेताना अडथळे येत होते.

डोंबिवली, एमआयडीसी, २७ गाव भागातील काही प्रवाशांनी घारिवली, दिवा-आगासन, शिळमार्गे मुंब्रा दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते अरुंद असल्याने या रस्त्यावर एकावेळी वाहनांचा भार वाढल्याने हे रस्ते जागोजागी कोंडीत अडकले. आगासन येथे रेल्वे फाटक आहे. या फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा आहेत. शिळफाटा रस्त्यालगतचे सर्व रस्ते वाहतूक कोंडीत अडकल्याने स्थानिक रहिवाशांना गावातून आपली वाहने मुख्य रस्त्यावर काढणे मुश्किल झाले. शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस या कोंडीत अडकल्या. दुचाकीवरून आपल्या मुलाला लोढा, पलावा येथील शाळेत काही पालक सोडतात. हे पालक जागोजागी कोंडीत अडकले होते.

शिळफाटा रस्ता कोंडीत अडकल्याचे समजल्यावर काही वाहन चालकांनी डोंबिवलीतून मोठागाव माणकोली उ्डाण पूलमार्गे ठाणे दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. ही वाहने एकाचवेळी डोंबिवलीत आल्याने डोंबिवलीत दिनदयाळ रस्ता, मोठागाव, उमेशनगर भागात कोंडी झाली होती. शिळफाटा रस्त्यालगत अनेक शाळा आहेत. परीक्षांचे दिवस जवळ आले आहेत. मुलांच्या तोंडी, प्रायोगिक परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत असल्याचे शाळा चालकांनी सांगितले. वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यावर कोंडी होऊ नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवला असला तरी प्रवाशांनी पलावा चौकाकडे जाण्याला पसंती दिली. रात्रीपासून शिळफाटा रस्ता कोंडीत अडकला. पहिल्याच दिवशी एवढी कोंडी. यापुढील पाच दिवस या रस्त्यावरून कसे जायायचे या विवंचनेत नोकरदार, व्यावसायिक आहेत.