Shilphata Road Traffic Updates : निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पहिल्याच दिवशी या रस्त्यावर बुधवारी सकाळी अभूतपूर्व कोंडी झाली. या कोंडीमध्ये मुंंब्रा बाह्यवळण रस्त्यावर एक तेलवाहू ट्रक उलटल्याची आणखी भर पडली. शिळफाटा आणि मुंब्रा बाह्य वळण रस्त्यावर दोन्ही बाजुने लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारांची वाहने या कोंडीत अडकली.

या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना एक ते दीड तासाचा कालावधी लागला. शिळफाटा रस्त्यावर जो प्रवास २५ ते ३० मिनिटात होतो. त्या प्रवासासाठी प्रवाशांना एक ते दीड तास लागत होता. मोटार, दुचाकी स्वारांनी मिळेल त्या रस्त्याने, पर्यायी मार्गाने कामाच्या ठिकाणी पोहचण्याचे प्रयत्न केले. ते प्रयत्न फोल ठरले. केडीएमटी, नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस कोंडीत अडकल्या. पर्यायी रस्ते वाहन कोंडीने गजबजलेले होते. सकाळच्या वेळेत रस्त्यावर पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलीस नसल्याने प्रत्येक वाहन चालक पुढे जाण्याचा, कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.

शिळफाट्यावरील कोंडीतून बाहेर पडण्यासाठी डोंबिवली, कल्याण परिसरातील वाहन चालकांनी दिवा, आगासनमार्गे शिळ, मुंब्रा दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. हा रस्ता अरूंद असल्याने, या मार्गावर आगासन रेल्वे फाटक असल्याने या मार्गावर कोंडी झाली. हा अरूंद रस्त्यावरील कोंडीत ठाणे, नवी मुंबईकडून आणि डोंंबिवलीतून जाणारी वाहने अडकली. आगासन रेल्वे फाटक बंद असल्याने या फाटक परिसरातील रस्ते वाहनांना गजबजून गेले होते. एक ते दीड तासानंतर या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची सुटका झाली. शिळफाटा रस्त्यावरून काटई चौकमार्गे खोणी तळोजामार्गे काही वाहन चालक गेले. त्यांना पाईपलाईन रस्त्यावर कोंडीचा सामना करावा लागला. कामाच्या ठिकाणी वेळेवर न पोहचता आल्याने अनेक प्रवासी संताप व्यक्त करत होते.

आता पुढील पाच दिवस शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असल्याने पाच दिवस या रस्त्याचे काय होणार, या रस्त्यावर अशीच कोंडी झाली तर अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांचे काय होणार असे प्रश्न प्रवासी करत आहेत. रुग्णवाहिका चालकांना रुग्ण नवी मुंबई, पनवेल भागात न्यायचा असेल तर त्यांनाही कोंडीचा सामना करत जावे लागणार आहे. या कोंडीला कंटाळुन काही प्रवाशांनी विशेषता महिला अधिकाऱ्यांंनी पाच दिवस सुट्टी टाकून तर काहींनी घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवसभरात शिळफाटा रस्त्यावरील बंदोबस्तावरील वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक वाढले. मुख्य, पर्यायी रस्ते मार्गावर या सेवकांनी वाहतुकीचे नियोजन सुरू केल्याने दुपारनंतर शिळफाटा आणि पर्यायी रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Story img Loader