Shilphata Road Traffic Updates : समर्पित जलदगती रेल्वे मार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून बुधवारी मध्यरात्रीपासून शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीचे काम अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने सुरू करण्यात आले. हे काम पाच दिवसात समर्पित जलदगती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुर्ण केले जाणार आहे.
या पूल उभारणी कामाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, समर्पित जलदगती रेल्वे विभागाचे वरिष्ठ अभियंते, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, मुंब्रा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या पूल उभारणीचे काम शक्तिमान यंत्रांच्या साहाय्याने केले जाणार आहे. पुलाच्या आधार खांबांवर भक्कम तुळया आणि त्यावर रस्ता पृष्ठभागाचे तयार मजबूत टप्पे ठेवले जाणार आहेत. रस्ते मार्गाखालील भाग बाजुच्या रेल्वे मार्गाला धक्का न लावता खोदण्यात आला आहे. खोदण्यात आलेल्या भागात सिमेंटचे मजबूत ब्लाॅक बसविण्यात येणार आहेत. या ब्लाॅकच्या मध्यभागातून रेल्वे मार्ग जाईल. या बोगद्यातून दुमजली कंटेनरची वाहतूक होऊ शकेल अशा पध्दतीने या पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे, अशी माहिती समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाच्या (डेडिकेटेड फ्रेट काॅरिडाॅर कार्पारेशन) अधिकाऱ्यांनी दिली.
समर्पित जलदगती रेल्वे मार्ग दिल्ली ते जेएनपीटीला(उरण) जोडला जाणार आहे. या दुहेरी रेल्वे मार्गावरून फक्त मालवाहू वाहतूक होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे रस्ते वाहतुकीवरील मालवाहू वाहनांचा भार कमी होणार आहे. यापूर्वी मुंबई ते दिल्ली अठरा ते वीस तास रस्ते मार्गावरील मालवाहतुकीसाठी लागत होते. या रेल्वे मार्गामुळे तेरा तासात जेएनपीटी येथून दिल्ली येथे माल पोहचविणे शक्य होणार आहे. या रस्ते मार्गामुळे इंधन बचत, प्रदुषण कमी करणे, रस्ते मार्गावरील भार कमी होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या पूल उभारणीच्या कामासाठी पाच दिवस शिळफाटा रस्ता बंद असला तरी पुढील अनेक वर्ष या रस्त्यावरून प्रवाशांना सुखरूप प्रवास करणे शक्य होणार आहे, असे वाहतूक विभागाचे अधिकारी सचिन सांडभोर यांनी सांगितले.