कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाकडून ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत केले जाणार आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाट्यासह पर्यायी रस्ते मार्गांवर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी १५० हून अधिक वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक विविध रस्त्यांवर चक्राकार पध्दतीने २४ तास तैनात असणार आहेत, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक परिसर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाचे वरिष्ठ, मेट्रो, डीएफसीसी विभागाचे अधिकारी यांची एक बैठक लोढा पलावा येथील एका शाळेच्या सभागृहात सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत शिळफाटा रस्ता बंदचा प्रवाशांना त्रास होऊ नये, पर्यायी रस्ते मार्गावरील वाहतूक नियोजन विषयावर चर्चा करण्यात आली. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कल्याण, मुंब्रा वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, कोळसेवाडी, डोंबिवली वाहतूक विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी पाच दिवस शिळफाटा वाहतूक बंदीचा कोणाही प्रवाशाला वाहतूक कोंडीच्या माध्यमातून त्रास होऊ नये म्हणून स्वता तैनात असणार आहेत.

वाहतूक बंदोबस्त

शिळफाटा रस्त्यासह संलग्न पर्यायी आठ ते दहा रस्त्यांवर वाहतूक पोलीस, अधिकारी दिवस, रात्र तैनात असणार आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट स्वता वाहतूक नियोजनावर लक्ष ठेवणार आहेत. एक साहाय्यक पोलीस आयुक्त, एक पोलीस निरीक्षक, आठ पोलीस उपनिरीक्षक, ६० अंमलदार, पुलाचे काम करणाऱ्या टाटा कंंपनीकडून ६० वाहतूक सेवक उपलब्ध होणार आहेत. यामधील ३० वाहतूक सेवक कोळसेवाडी वाहतूक, ३० मुंब्रा वाहतूक हद्दीत तैनात असणार आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्यासह मानपाडा पोलीस वाहतूक नियोजनासाठी सहकार्य करणार आहेत. पाच पोलीस उपनिरीक्षक बाहेरून बंदोबस्तासाठी मागविले जाणार आहेत.

बंदोबस्ताची ठिकाणे

शिळगाव-आगासन फाटा, डोंबिवली माणकोली पूल, नेवाळी नाका, काटई चौक, खोणी गाव तळोजा रस्ता, कल्याण फाटा.

शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी पाच दिवस पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांनी शिळफाटा रस्ता दिशेने न येता अधिकाधिक पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा. शिळफाटा बंदच्या कालावधीत कोंडी मुक्त रस्ते राहतील यासाठी प्रयत्न करावेत. जड, अवजड वाहन चालकांनी शिळफाटा सोडून बाहेरील महामार्ग, रस्त्यांचा अवलंब करावा. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.

Story img Loader