कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दिवसा सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेतच अवजड वाहनांना वाहतुकीसाठी मुभा आहे. अशाही परिस्थितीत या वेळेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहने राजरोस शिळफाटा रस्त्यावरून दिवसाही धावत असल्याने शिळफाटा रस्त्यावर मागील काही दिवसांपासून पुन्हा वाहन कोंडी सुरू झाली आहे.
ही अवजड वाहने पत्रीपूल, काटई, देसई अरूंद रस्ता भागात धावत असली की सर्वाधिक वाहन कोंडी होते. शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी दूर करण्यासाठी आणि सकाळ, संध्याकाळ नोकरदार प्रवाशांना सुलभ प्रवास करता यावा म्हणून शिळफाटा रस्त्यावरील चोवीस तासांची अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री १२ ते सकाळी सहा आणि दिवसा सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेतच शिळफाटा रस्त्यावर अवजड वाहनांना मुभा आहे.
या वेळेची अंमलबजावणी करणे हे कोळसेवाडी, डायघर-मुंब्रा वाहतूक पोलिसांचे काम आहे. परंतु, वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकांशी संगनमत करतात आणि वेळेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून वाहतूक पोलीस अवजड वाहनांना शिळफाटा रस्त्यावरून परवानगी देत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
मालवाहू अवजड वाहने संथगतीने धावत असल्याने त्या मागे वाहनांच्या रांगा लागतात. या वाहनांच्यामध्ये दुचाकी स्वार घुसतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. पत्रीपुलाजवळ भिवंडी दिशेने येणारी वाहने वाहतूक पोलिसांकडून शिवाजी चौकाकडे जाणारी वाहने जाण्यासाठी रोखून धरली जातात. त्यामुळे गोविंदवाडी वळण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. ही वाहने सोडली की पत्रीपुलावर कोंडी होते. काटई नाका भागात वाहतूक पोलीस एकाच मार्गिकेतून वाहने सोडणे आणि ही वाहने सोडून झाल्यावर मग समोरून येणारी वाहने एकाच मार्गिकेतून सोडणे असे प्रयोग करत असतात. हे प्रयोग प्रवाशांना त्रासदायक होत असल्याने ते वाहतूक पोलिसांनी बंद करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
मागील काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावरून अवजड वाहने अधिक संख्येने धावत आहेत. त्यामुळे दुपारच्या कर्तव्यासाठी कामावर निघालेल्या नोकरदारांना एक ते दीड तास या कोंडीत अडकून पडावे लागते. दुपारच्या वेळेत वाहतूक पोलिसांची संख्या रस्त्यावर कमी असते. त्यामुळे वाहन चालक मनमानी पद्धतीने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.
हेही वाचा – ठाणे: घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतल रस्त्यामुळे अपघातांची भीती
संध्याकाळच्या वेळेत शाळेतून घरी परतणाऱ्या, खासगी शिकवणीला निघालेल्या शिळफाटा परिसरातील गृहसंकुलातील, गावांमधील मुले, पालकांना या कोंडीचा फटका बसत आहे. तळोजा, मुंब्रा, डायघर आणि कोळसेवाडी पोलिसांनी अवजड वाहनांच्या वेळेच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे यासाठी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी आदेश देण्याची प्रवाशांची मागणी आहे.
शिळफाटा रस्त्यावर वेळेच्या नियमावलीत अवजड वाहने सोडली जातात. सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेनंतर अवजड वाहन या रस्त्यावर दिसले की कारवाई केली जाते. रात्री १२ ते सकाळी सहा वेळेत फक्त अवजड वाहनांना मुभा आहे. शिळफाटा रस्त्यावर कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलीस या रस्त्यावर तैनात असतात. – सचीन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कोळसेवाडी.