भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. २४ दिवस ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या कल्याणमध्ये लोकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. महेश गायकवाड म्हणाले, “मी रुग्णालयात असताना डॉ. श्रीकांत शिंदे माझ्याशेजारी येऊन बसायचे आणि डोक्यावर हात फिरवत म्हणायचे, काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. माझ्या डोळ्यातून त्यावेळी पाणी आले. कार्यकर्त्यावर जेव्हा संकट येतं, तेव्हा आपल्या पाठी आपला नेता असेल तर आपण कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो.”
गणपत गायकवाड गोळीबारावर म्हणाले..
आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराबाबत महेश गायकवाड पत्रकार परिषदेत म्हणाले की, आमदारांनी बिल्डरांशी संगनमत करून शेतकऱ्यांची जमीन विकत घेतली होती. शेतकऱ्यांनी माझ्याकडून न्याय मिळावा अशी मागणी केली होती. बिल्डरकडून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यानंतर गणपत गायकवाड बळजबरीने त्या जमिनीला कम्पाऊंड लावत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी मला फोन करून याबाबत कळवले. आमदारांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नव्हते. त्याचा मी कडाडून विरोध केला. या प्रकरणाबद्दल चर्चा करण्यासाठी त्यादिवशी आम्हाला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी रचलेलं षडयंत्र आमच्या लक्षात आलं नाही, ते असं काही करतील याची आम्हाला कल्पना नव्हती.
शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून घरी सोडले
“यापुढील सर्व प्रकरण सर्वांनाच माहीत आहे. देवाची कृपा होती, म्हणून मी वाचलो. हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय या सर्वांचा मी आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया देऊन तब्येतीच्या कारणास्तव महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद संपविली.
तर जीवनाचे सार्थक होईल
महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी आपल्या कार्यालयाबाहेर समर्थकांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, “मला आज बाळासाहेबांचे शब्द आठवत आहेत. जीवनात आपण कुणाच्यातरी कामी आलो तर खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. मी आपल्या प्रेमापोटी, सर्वांच्या आशीर्वादामुळे मला परत एकदा सर्वांची सेवा करण्याची सेवा मिळाली आहे. पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने मी आता कल्याणकरांची सेवा करणार आहे. यापुढेही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, त्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत मदत करण्याचे काम करेल.”
“मला अधिक बोलता येणार नाही. कारण अजूनही बोलताना श्वास घेण्यात अडचण येते. याप्रसंगी माझा परिवार आणि कल्याणकरांचा मी ऋणी आहे. माझ्या कार्यालयातून लवकरच जनसेवेचं काम सुरू करणार आहे”, असे बोलून लवकरच पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचे सुतोवाच महेश गायकवाड यांनी केले.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना सोमवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून सुस्थितीत झाल्याने घरी सोडण्यात आले. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर २ फेब्रुवारीपासून महेश गायकवाड ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते. महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सोडण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारपासून त्यांचे समर्थक कार्यकर्ते महेश यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करत होते. महेश गायकवाड यांचे कल्याण पूर्वेतील तिसगाव भागातील जनसंपर्क कार्यालय, घराचे प्रवेशव्दार झेंडुच्या फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईने सजविण्यात आले.