लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: मैत्रिपूर्ण आणि सर्वसहमतीच्या राजकारणासाठी गेली अनेक वर्ष ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात राज्यात सत्ताबदल होताच राजकीय राडेबाजीला उत आला असून ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यास सोमवारी रात्री झालेल्या मारहाणीमुळे राजकीय वैमन्यस्याचा नवा अंक पाहायला मिळाला. दोनच दिवांपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्याला झालेली मारहाण, काही महिन्यांपूर्वी भाजप कार्यकर्त्यावर झालेला जीवघेणा हल्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वागळे इस्टेट या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा झालेला प्रयत्न यांसारख्या घटना आता नित्याच्या बनू लागल्या असून यामुळे सूजान ठाणेकरांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
घोडबंदर येथील कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर कार्यालयात शिरून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदे यांनी केला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुपारी उशीरापर्यंत कासारवडवली पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पंरतु या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे सुसंस्कृत ठाण्यात राडेबाजीचे दर्शन आता वरचेवर होऊ लागले आहे.
दरम्यान, या घटनांमुळे ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. ठाण्यात पोलीस खात्याचे अस्तित्त्वच नाही, अशी टिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर पोलीस हे दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दरम्यान, आमच्या कार्यकर्त्या त्यांना केवळ समज देण्यासाठी गेल्या होत्या. मारहाण झालेली नाही. असा दावा शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी केला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार राजन विचारे यांच्यावरही टिका केली.
रोशनी शिंदे या घोडबंदर भागातील ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत. घोडबंदर येथील एका खासगी कंपनीत त्या काम करतात. कार्यालयात असताना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्या त्यांच्या कार्यालयाबाहेर आल्या. रोशनी शिंदेही कार्यालयाबाहेर आल्या. त्यावेळी त्या महिला आणि रोशनी शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर महिला त्यांना कार्यालयात घेऊन जात असल्याचे दिसून आले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. शिंदे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा रोशनी आणि ठाकरे गटाकडून केला जात होता. सोमवारी रात्री उशीरा ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर जमून ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच घोषणाबाजी केली. रोशनी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. परंतु मंगळवारी दुपारपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा किंवा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून टिकेची झोड उठविली जात आहे. तर शिंदे गटाकडूनही त्यांना प्रतिउत्तर दिले जात आहे. वारंवार होणाऱ्या या राजकीय राडेबाजीमुळे सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्याचे राजकीय वातावरण गढूळ झाल आहे.
आमदार जितेंद्र आव्डाड यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांच्या कारभारावर टिका केली आहे. ‘ठाकरे गटाची रोशनी शिंदे हिला ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण, मला खात्री आहे, काही होणार नाही. न्यायाची अपेक्षा सोडली. सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलीस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलीस सांगतात वरुन दबाव आहे. वरुन म्हणजे? असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तर खासदार राजन विचारे यांनी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून मारहाण करण्याचा पोलिसांनीच यांना परवाना दिला आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच रोशनीला काही झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचे म्हटले. तर शिंदे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांनी आरोप फेटाळले असून आमच्या कार्यकर्त्या समज देण्यासाठी त्याठिकाणी गेल्या होत्या. रोशनी या त्यांच्या फेसबुक खात्यावर आमच्या नेत्यांची बदनामी करत असतात, असा आरोप त्यांनी केला.
आणखी वाचा- “रोशनी शिंदे गर्भवती नाहीत हे कळलं, पण पोटात लाथा मारण्याचं…” उद्धव ठाकरेंचा संतप्त प्रश्न
ही घटना अत्यंत निंदनीय आहे. ठाणेकरांचा पाठींबा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरूणांना नोकऱ्या नाहीत, महागाई वाढत आहे, त्यात आता अशाप्रकारामुळे महिलाही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही चाललो आहे, असे शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणतात. महिलांवर हल्ले करण्याचे विचार साहेबांनी कधीच दिले नाही. आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. -केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.
रोशनी शिंदे या सातत्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांना समज देण्यासाठी महिला कार्यकर्त्या गेल्या होत्या. त्यानंतर रोशनी चालत पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. परंतु खासदार राजन विचारे यांचा सल्ला आला असावा त्यामुळे त्यांनी उलट्या येण्याची नाटके सुरु केली. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात त्यांना कुठेही बाह्यजखमा आढळून आल्या नाही. महिलेला पुढे करून तिच्या पदराआड राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडकविण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव फसलेला आहे. -नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिवसेना.
राजकीय राडेबाजीच्या घटना
१) खासदार राजन विचारे यांच्यावर ऑक्टोबर २०२२ मध्ये श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर शिंदेगटाकच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातून बाहेर पडणेही कठीण केले होते.
२) जानेवारी महिन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याला फलक बसविण्याच्या वादातून शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) ठाणे शहराजवळील दिवा भागात महाराष्ट्र- उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष सुशील पांडे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या निलेश पाटील यांच्यासह सात जणांवर मारहाणीचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भाजपचे नेते कृपाशंकर सिंहही याप्रकरणात तक्रार दाखल करण्यास आग्रही होते. हा प्रकारही जानेवारी महिन्यातील आहे.
४) गुढीपाडवा निमित्ताने लोकमान्यनगर भागात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला आणि त्याच्या आईला फलक बसविण्याच्या कारणावरून धक्काबुक्की केल्याचे समजते आहे. परंतु याप्रकरणात कोणाताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
५) काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांनी फेसबुकवर एक टिप्पणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ही टिप्पणी असल्याचे सांगत शिंदे गटाच्या तीन कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणातही गुन्हा दाखल झालेला नव्हता.