शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेकदा वाद झाला आहे. याआधी ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपली भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के म्हणाले की, ही शाखा शिवसेनेची शाखा आहे. ही आमची शाखा आहे. याठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे.
शाखेचं कुलूप तोडल्याबद्दल विचारलं असताना नरेश म्हस्के म्हणाले, “हे पाहा कुलूप तोडायचा काही प्रश्नच नाही. या शाखेतून व्यवस्थित काम सुरू होतं. त्यांनीच (ठाकरे गट) चुकीच्या पद्धतीने कुलूप लावलं. त्यांना आम्ही चावी मागितली, पण त्यांनी चावी दिली नाही. त्यामुळे आम्ही कुलूप काढलं आहे. येथे ठाकरे गटाचे एक-दोन लोक बसायचे. आम्ही त्यांना कधीही अडथळा आणला नाही. पण आमच्याच घरात बसायला त्यांची (ठाकरे गट) परवानगी मागावी लागत असेल, तर आम्ही हे कधीच सहन करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला अन्यायाविरोधात वाचा फोडण्याची शक्ती दिली आहे.”
हेही वाचा- ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शिंदे गटाने कुलूप तोडून शिवसेना शाखेवर घेतला ताबा
“निवडणूक आयोगानं शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तीही कसबा पोटनिवडणुकीपुरती परवानगी होती. आता सुप्रीम कोर्टातील सुनावणी होईपर्यंत त्यांच्याकडे ते नाव आहे. त्यांना शिवसेना नाव लावायची परवानगी नाही,” असंही नरेश म्हस्के म्हणाले.