काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी राहुल गांधींनी केली होती. यानंतर राहुल गांधींवर देशभरातून टीका होत आहे. तर, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत. आज ( २ मार्च ) ठाण्यात गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा माजी महापौर नरेश मस्के यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
“मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अनुद्गार काढले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: रस्त्यावर उतरत मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोड्यांनी हाणलं. राहुल गांधी सावरकरांचा माफीवीर उल्लेख करून, त्यांची निंदा नालस्ती करतात. पण, बाळासाहेबांचे वारसदार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत त्यांच्याबरोबर आघाडी करतात,” अशी टीका नरेश मस्के यांनी केली आहे.
हेही वाचा : “वीर सावरकरांचा अपमान करणारा एकही…” गौरव यात्रेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
“केवळ एका भाषणात राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणत असाल, तर रस्त्यावर उतरत राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे हाणा… त्यांचा निषेध करा. तुम्ही प्रत्येकवेळी बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहे, असं सांगता. मग बाळासाहेबांचे विचार कृतीत आणा… खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विरसलं आहात,” असे नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी आज सभेत सांगावं की गडाखांना मंत्रीपद का दिलं?” खोक्यांचा उल्लेख करत शिंदे गटाचं आव्हान!
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभा पार पडत आहे. त्याबद्दल विचारलं असता, नरेश मस्के यांनी सांगितलं, “ही हिंदूत्वाची शोकांतिका आहे. बाळासाहेब ठाकरे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसारणीच्या विरोधात लढले. बाळासाहेब स्वत: म्हणाले होते, मला जर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं, तर माझा पक्ष बंद करेन. मात्र, जे वारसदार समजतात ते खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाहीर सभा घेत आहेत. हे दुर्दैव आहे,” असं टीकास्र नरेश मस्के यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना केलं आहे.