ठाणे : २०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, त्यावेळी शिवसनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंद देखील उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. यावर पत्रकार परिषदमध्ये नरेश म्हस्के यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अशोक चव्हाण यांचा आदर्श सर्वाना माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराबाबत सर्वत्र बातम्या पसरत आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या भोवतीचे संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाण अशा पद्धतीचे वक्त्यव्य करत आहे” असे म्हस्के म्हणाले.
दरम्यान विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी रात्री उशिरा ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवीकडे काय मागणे मागितले असे पत्रकारांनी विचारले असता आपण देवीला ४० महिषासूरांचा नायनाट कर असे मागणे मागितले असल्याचे दानवे म्हणाले होते.
याबाबत नरेश म्हस्के यांनी दानवे यांचा समाचार घेत टीका केली आहे.” अंबादास दानवे कोण आहेत? त्यांची योग्यता काय आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीने ते विधान परिषदेवर निवडून आले आहेत. इतके वर्ष त्यांना टेंभी नाक्यावरील नवरात्रउत्सव दिसला नाही. दानवे यांना उत्सवासाठी येण्याचे कुठल्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरी ते दर्शनाला आले. त्या बाबत आमची कोणतीही हरकत नाही. मात्र त्यांनी इथे येऊन राजकारण केले. त्यामुळे ते केवळ संधी साधू आहेत” अशी प्रतिक्रिया म्हस्के यांनी दिली.