ठाणे : ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपाने शनिवारी दिवसभर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर रेपाळे, भोसले यांच्यासह सहा कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ठाण्यातील शिंदे समर्थक आणि भाजपमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही जणांचा फलक बसविण्याच्या कारणावरून वाद झाला. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र शुक्रवारी सायंकाळी १५ ते २० जणांच्या जमावाने जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांना शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  हा हल्ला रेपाळे आणि भोसले यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यासंदर्भात ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून ट्विटही करण्यात आले होते. नंतर ट्विट हटविण्यात आले. हे दोघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंत्यत निकटवर्तीय मानले जातात.

मारहाणीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात जाधव यांना काही जण मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. याआधारे पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करत भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यांनी सीसीटीव्हीमध्ये मारहाण करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर लागलीच गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली. जोपर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच बसून राहण्याच्या इशारा यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना दिला. अखेर शनिवारी रात्री उशिरा वागळे इस्टेट पोलीसांनी माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र यामुळे शिंदे गट आणि भाजपामधील वाद विकोपाला जात असून दोन्ही पक्षाचे स्थानिक पातळीवरील संबंध अत्यंत तणावाचे असल्याचे दिसून येत आहे.

कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. ठाणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अशा प्रकरची कृत्ये होणे अयोग्य आहे. भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. शहरात चालणारी दादागिरी अजिबात खपवून घेतील जाणार नाही.

– संजय केळकर, आमदार, भाजप

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group vs bjp in thane bjp mlas police station case has been registered activists of shinde group ysh
Show comments