ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकल्याने महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. यावर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजन विचारे म्हणाले, “महाराष्ट्राने गेले नऊ महिने चाललेला हा तमाशा आणि अत्याचार पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एका युवती सेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शोरूममध्ये जात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आली.”

हेही वाचा : “राऊत, फाऊद, दाऊद जे असतील, यांना सांगतो…”, मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

“तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पण फक्त अर्ज दाखल करून घेण्यात आला. रुग्णालयात तपासण्यासाठी गेलो, तर तिथे दाद देण्यात आली नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांना छळण्यासाठी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे चाललो, असे सांगता. मग, एखाद्या महिलेला चक्कर येईपर्यंत मारहाण करतात, ही अमानुष घटना आहे. उद्या त्या मुलीला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल,” असे राजन विचारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांचे माफीपत्र! सावरकर होण्याची राहुल गांधींची योग्यता नाही; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पोस्ट टाकल्याने त्यास घरात घुसून मारहाण करत व्हिडीओ तयार केला. पोलिसांनी यांना मारहाण करण्याची परवानगी दिली आहे का? का मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे? ठाण्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. पोलीस संरक्षणात हे सर्व चालू आहे,” असा गंभीर आरोप राजन विचारे यांनी केला आहे.

१२ उलटूनही गुन्हा दाखल नाही

घोडबंदर येथील कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शोरूममध्ये घुसून काही महिलांनी हल्ला केला. या घटनेनंतर खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, घटनेला १२ तास उलटूनही याप्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group womens beat thackeray group woman in thane rajan vichare on eknath shinde ssa