ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाजमध्यमांवर नोंदविली आहे.
हेही वाचा >>> कथोरेंना कोंडीत पकडण्याचे सर्वपक्षीय प्रयत्न ?
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. दिघे यांचे समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखविण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही वर्षांपूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचे काम सुरू केले. सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे,बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली
दरम्यान, या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केले. त्यावेळी त्यांच्यावर टेंभीनाका शाखाप्रमुख निखिल बुडजूडे आणि पोलिस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली. त्याची चित्रफीत समाजमध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे. “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…आमचा आनंद हरपला ” अशी प्रतिक्रिया केदार यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
ओवाळून टाकलेल्यांनी आम्हाला शिकवू नये
आनंद दिघे यांची परंपरा आणि त्यांनी सुरू केलेले उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत. गणपती विसर्जनानंतर ढोल पथके आनंद दिघे यांना भेटण्यासाठी टेंभीनाक्यावर यायची, तेव्हा दिघे हे त्यांना बक्षिस द्यायचे. ही दरवर्षीची प्रथा आहे. परंतु काही लोक आनंद आश्रमातील व्हिडीओ चुकीचे पद्धतीने प्रसारित करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांची पैसे वाटण्याची पद्धत चुकीची असल्याने त्यांच्यावर पक्षाने करवाई केली आहे. मात्र ज्यांना ओवाळून टाकले, त्यांनी आम्हाला दिघे साहेब काय आहेत हे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.