डोंबिवली – राजकारणात आपले गुरू मानलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांची शिंदे शिवसेनेतील कल्याण ग्रामीणमधील नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी मंगळवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि पुढील वाटचालीसाठी माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्याकडून आशीर्वाद घेतले. या भेटीच्यावेळी डोंबिवली विधानसभेत महायुतीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे दीपेश म्हात्रे आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी म्हात्रे कुटुंबियांकडून आ. मोरे यांचा सन्मान करण्यात आला. तर आ. मोरे यांनीही गुरू पुंडलिक म्हात्रे यांचा सन्मान केला.
विधानसभा निवडणूक काळात दीपेश म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटातून भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. निवडणूक काळात आणि त्यापूर्वी तीन महिने अगोदर विविध पद्धतीने मंत्री चव्हाण यांना दीपेश म्हात्रे यांच्याकडून लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे दीपेश म्हात्रे आणि भाजप मंत्री चव्हाण यांच्यात जोरदार धुसफूस सुरू होती. विधानसभा निवडणूक काळात ही धुसफूस शिगेला पोहचली होती. अशा परिस्थितीत शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणमधील नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर विरोधक दीपेश म्हात्रे कुटुंबीयाची मंगळवारी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा – कुणबी मतांच्या बेरजेमुळे दरोडांचा विजय
कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे महायुतीचे उमेदवार होते. या मतदारसंघात भाजपने मनसेचे राजू पाटील यांचे सुप्तपणे काम केल्याच्या तक्रारी शिंदेसेनेकडून भाजप वरिष्ठांकडे करण्यात आल्या. या बदल्यात मनसेने डोंबिवलीत भाजपला साथ दिल्याची चर्चा होती. भाजपने विशेषत: मंत्री चव्हाण यांनी ग्रामीणमध्ये आपणास मदत केली नाही म्हणून त्या इर्षेतून नवनिर्वाचित आ. मोरे यांनी ठाकरे गटाचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, दीपेश म्हात्रे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि राजेश मोरे हे जुने मित्र आहेत. पुंडलिक म्हात्रे यांच्याकडून आ. राजेश मोरे यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले. त्यांच्या सोबतीने आपला राजकीय प्रवास केला. आ. मोरे हे ज्येष्ठ शिवसैनिक पुंडलिक म्हात्रे यांना गुरू मानतात. या भेटीच्यावेळी त्यांनी राजकीय अभिनिवेश बाजुला ठेऊन गुरू म्हणून पुंडलिक म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पुंडलिक म्हात्रे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासापासून आ. राजेश मोरे त्यांचे पाठीराखे आहेत. म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आ. मोरे हेही त्यांच्या सोबत होते. अनेक वर्षांचे ते शेजारी आहेत. आपल्या गुरूच्या आशीर्वादाने आणि समोर आपण आमदार झालो. याचा सार्थ अभिमान म्हणून मोरे यांनी पुंडलिक म्हात्रे कुटुंबियांची भेट घेतली. यामध्ये पक्षीय राजकारण नाही, असे ठाकरे गटाच्या आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.