कल्याण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्हयात भरभरून प्रतिसाद मिळत असताना, कल्याणचे शिवसेना नेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत जेमतेम अडीच हजार मतांनी पराभवाच तोंड पाहाव लागलेले बंड्या साळवी हे कल्याणातील शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्याकाही दिवसांपासून त्यांच्या मागे पोलिस कारवाईचा ससेमिरा लागला आहे. उद्धव ठाकरे यांची केलेली साथ त्यांना राजकीय दृष्ट्या महागात पडू लागल्याची चर्चा ही रंगली आहे. काही दिवसांपूर्वी तर, कल्याण पोलिसांनी त्यांना थेट तडीपार होण्याची नोटिस बजावली. यामुळे अडचणीत आलेल्या बंड्या साळवी यांच्या मदतीला चक्क मुख्यमंत्री समर्थक आमदार विश्वनाथ भोईर गुरुवारी धाऊन गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ सर्वांना माहिती आहे”; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून शिवसेनेकडून कोणता उमेदवार द्यायचा याचा खल सुरु होता. राजेंद्र देवळेकर स्वत: बंड्या साळवी तसेच इतर काही नावे ही पक्षात चर्चेत होती. कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला तरीही, नेत्यांमधील असलेल्या मतभेदांमुळे या मतदार संघात शिवसेनेला सतत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे काहीही करा आणि एकमताने उमेदवार ठरवा असे फर्माण एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोडले. त्यावेळी बंड्या साळवी यांनी विश्वनाथ भोईर यांच्या नावाला दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला होता. या मैत्रीची बूज राखत अडचणीत आलेल्या बंड्या साळवी यांच्या मदतीसाठी सध्या शिंदे समर्थक असलेल्या आमदार भोईर यांनी थेट पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतल्याने या दोघांच्या मैत्रीतील दुवा अधिक घट बनला आहे.

हेही वाचा >>> कल्याण मधील मेट्रो माॅल समोर नवी मुंबई परिवहनच्या बसला आग ; जीवित हानी टळली, बस आगीत जळून खाक

विजय साळवी यांच्यावरील १५ गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या, दुर्गाडी, मलंगगड आंदोलना संदर्भात आहेत. पण सत्तेचा आधार घेऊन बाहेरील एका उमद्या नेत्याच्या आग्रहावरुन ही कारवाई करण्यास भाग पाडण्यात आल्याची कल्याण मधील शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. साळवी यांची कार्यपध्दती अनेक वर्ष अनुभवलेल्या शिवसैनिकांना त्यांच्यावर झालेली कारवाई पसंत नसल्याने अखेर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आ. विश्वनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, मोहन उगले व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त गुंजाळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मग पोलीस प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आ. भोईर यांनी केली.

या निवेदना संदर्भात आ. भोईर यांनी सांगितले, या तडिपारीच्या नोटिसीवरुन आपणास साळवी यांनी संपर्क साधला. त्यांनी त्यांचे मनोगत आपल्या जवळ व्यक्त केले. हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ. भोईर यांनी आपण शिवसेनेतील कोणत्या बाजुचे आहोत याचा कोणताही विचार न करता आपला एका जुना कट्टर समर्थक अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याला आपल्या परीने त्यांना साहाय्य करणे हे आपले कर्तव्य समजून त्यांच्या मदतीसाठी आमदारांनी धाव घेतली, असे शिंदे समर्थक शिवसैनिकांनी सांगितले.

विजय साळवी यांच्यावरील गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. त्यांना तात्काळ तडिपार करणे योग्य होणार नाही, असे निवेदन आ. भोईर यांनी पोलीस उपायुक्त गुंजाळ यांना दिले. सर्व कायदेशीर बाजू तपासून साळवी यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आ. विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

अशा कारवायांमध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही किंवा साळवी यांच्यावर कोणाचाही आकस नाही. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. अशा कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत. त्यामुळे अशा कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना अजिबात वेळ नाही, असे आ. भोईर यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेत आमदारकीचा उमेदवार निवडीवरुन संघर्ष सुरू होता. या चढाओढीत सचिन बासरे, विजय साळवी, दिवंगत प्रकाश पेणकर, दिवंगत राजेंद्र देवळेकर, अरविंद मोरे यांची नावे चर्चेत होती. यावेळी झालेल्या शिवसेना वरिष्ठ नेत्यांच्या सामोपचाऱाच्या बैठकीत विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्यात यावी असे मत मांडण्यात विजय साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याची जाणीव आ. भोईर यांना असल्याने ते साळवी यांच्या मदतीला धावले असल्याचे शिवसैनिकांच्या चर्चेतून समजते.