राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरु असून सर्व संधींचा फायदा घेतला जात आहे. यामुळेच ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने दोन्ही गट आमने-सामने आहेत. गणेशोत्सव, नवरात्रनंतर आता दिवाळीतही दोन्ही गट मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थिती लावून शक्तीप्रदर्शन केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन मार्ग येथे शिंदे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषण केल्यानंतर शक्तीप्रदर्शन केलं. तीन महिन्यांपूर्वीच एक सामना आपण जिंकलो असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी टीका केली असून हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
“प्रत्येकाच्या दिवाळी पहाटची संकल्पना वेगळी आहे. लोकांमध्ये जाणं ही आमची संकल्पना आहे. मोठे अभिनेते आणून लोकांवर छाप मारत नाही. प्रत्येक ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण होत असेल तर त्याला केविलवाणा प्रयत्न म्हणायला हवं,” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
“किती मोठ्या प्रमाणात लोक विचारांच्या बाजूने आहेत हे दिसत आहे. अन्यथा अख्खं ठाणे शहर तिथे दिसलं असतं,” असा टोलाही त्यांनी लगावला.
तीन महिन्यांपूर्वीच एक सामना आपण जिंकलो- एकनाथ शिंदे
“काल मेलबर्न स्टेडीयमवरील क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. पण आपण तीन महिन्यांपूर्वी एक सामना जिंकलो होतो,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
“काल भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होता. या सामन्यात बाळासाहेबांची शिवसेनाचे फलक मेलबर्न स्टेडियमवर झळकले. भारताने या ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तानला हरविले. तीन महिन्यांपूर्वी आपणही एक सामना खेळलो आणि जिंकलो,” असे पुनरूच्चार शिंदे यांनी काढले.