ठाण्याची चौपाटी अर्थात मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण. संपूर्ण तळ्याभोवतीचा हा कट्टा म्हणजे विविध वयोगटाचे हक्काचे ठिकाण. रोज सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणारा एक वर्ग.. हॉटेल साईकृपासमोरचा कट्टा म्हणजे तरुणाईची वर्दळ, शिवाजी मैदानाच्या समोरचा कट्टा म्हणजे श्रमजीवीचे ठिकाण.. या कट्टय़ाच्या प्रत्येक ठिकाणचे एक वैशिष्टय़ आहे. अनेकांच्या सुखदु:खाचा साक्षीदार असलेला हा कट्टा अर्थात मासुंदा तलावपाळी ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे मनमोहक ठिकाण म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याच तलावपाळीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याशेजारी पंधरवडय़ातून एकदा देशभक्तीचे सूर गुंजणार आहेत.

नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून ठाणेकरांची वाहवा मिळविणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी शिवभक्ती बॅण्डस्टॅण्ड ही संकल्पना अमलात आणली आहे.

नुकतेच (बुधवारी) या शिवभक्ती बॅण्डस्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. पंधरा दिवसातून एकदा सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत ठाणे पोलीस, ठाणे महानगरपालिका व भारतीय सेना यापैकी एका बॅण्ड पथकामार्फत सादर करण्यात येणाऱ्या देशभक्तीपर गीतांचा आस्वाद ठाणेकर नागरिकांना घेता येणार आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना किंवा कलावंतांना आपली कला सादर करावयाची असल्यास त्यांना हा शिवभक्ती बॅण्डस्टॅण्ड विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा बॅण्डस्टॅण्ड विनामूल्य नोंदणी करण्यासाठी कलाप्रेमींनी महापालिकेतील माहिती जनसंपर्क विभागाशी संपर्क साधावायचा आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना कला सादर करण्यासाठी मध्यवर्ती असे हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमामुळे पुन्हा एकदा आयुक्त हे ठाणेकर नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्यानंतर संजीव जयस्वाल यांनी ठाणे शहरात अनेक उपक्रम राबवून ठाणेकरांची वाहवा मिळवली.

सांस्कृतिक उपराजधानी असे ठाणे शहराला संबोधले जाते. अनेक कलावंत या ठाण्यात राहतात किंबहुना अनेक कला या ठाण्यात आहेत असे अभिमानाने सांगितले जाते. चोखंदळ ठाणेकर, दर्दी ठाणेकर, मनमुराद दाद देणारा ठाणेकर असे अनेकदा ऐकावयास मिळते. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला रसिक ठाणेकर हा हजेरी लावतोच मग तो कार्यक्रम सशुल्क असो की विनामूल्य ठाणेकर त्याला प्रतिसाद देतात. त्यामुळे हा शिवभक्ती बॅण्डस्टॅण्ड लवकरच ठाणेकरांची लोकप्रियता मिळविणार यात शंका नाही. अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी सभागृह किंवा नाटय़गृह घेणे परवडत नाही. अशा कलाप्रेमींसाठी हे हक्काचे ठिकाण आयुक्तांनी उपलब्ध करून दिले आहे.

Story img Loader