डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिव मंदिर आर्ट फेस्टिवलला गुरूवार, १६ मार्चपासून सुरूवात होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील शिव मंदिरात महाआरती करत याचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात चार दिवस जगविख्यात गायक कलावंत, नामवंत कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटींग, पोट्रेट पेंटिंग, शिल्पकला अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.
हेही वाचा >>>ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार
शिव मंदिर आर्ट फेस्टिवल यंदा चार दिवस रंगणार असून पहिल्यांदाच शनिवार १८ आणि रविवार १९ मार्च रोजी संगीत पहाट आयोजित करण्यात आली आहे. १६ मार्चला पहिल्या दिवशी राकेश चौरसिया आणि त्यांचे सहकारी तसेच पंकज उदास यांच्या कार्यक्रमाचे महोत्सवाला सुरूवात होईल. दुसऱ्या दिवशी अमित त्रिवेदी, तर तिसऱ्या दिवशी पहाटे अनुराधा पौडवाल तर सायंकाळी मोहित चौहान आणि रविवारी पहाटे मैथिली ठाकूर आणि सायंकाळी शंकर महादेवन कला सादर करतील. यंदाही दरवर्षीप्रमाणे महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कलादालनात ६० हून अधिक नामवंत कलावंत त्यांच्या उत्तम कलाकृतीं प्रेक्षकांच्या समोर साकारणार आहे. तर काही कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती कलादालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून विविध केंद्रांवर त्या उपलब्ध आहे.