विधानसभा निवडणुकीनंतर ‘नमो’ लाटेवर स्वार होत ठाणे जिल्ह्य़ात सेनेपेक्षा काकणभर सरस कामगिरी करणाऱ्या भाजपचा स्वबळाचा दावा फुसका ठरवत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकेत शिवसेनेने निसटते का होईना बहुमताचे शिखर गाठले आहे.  
अंबरनाथमध्ये ५७ पैकी २५ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. एक शिवसेना पुरस्कृत उमेदवार mu04तर दोन ठिकाणी सेना बंडखोर विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ २८ झाले असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अवघ्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. भाजपला दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या निवडणुकीत रिपाइंसोबत असूनही अवघ्या तीन जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यंदा स्वतंत्रपणे लढताना आठ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीलाही अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले, तर  मनसेला यंदा अवघ्या दोन जागा मिळाल्या. सहा अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.mu03बदलापूरमध्ये सेनेला बहुमत
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला काठावरचे का होईना बहुमत मिळाले असून पालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेना सत्तेत येणार आहे. शिवसेनेला २४ तर भाजपला २० जागा मिळाल्या आहेत.  राष्ट्रवादीला दोन तर एक अपक्ष निवडून आला आहे. काँग्रेसला बदलापूरमध्ये खातेही खोलता आलेले नाही.नव्याने वाढलेल्या शहरीकरणात मुंबईहून आलेल्या स्थलांतरितांनी शिवसेनेला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून शिवसेनेचे संजय गायकवाड, मिथुन कोशिंबे, प्रभाकर पाटील तर भाजपचे मिलिंद नार्वेकर, मेघा गुरव, अविनाश पातकर आदी पाच ते दहा वर्षांपेक्षा जास्त सत्ता उपभोगलेल्या दिग्गजांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच अपक्ष शेख नदीम मोहम्मद अमिन, शिवसेनेचे चेतन धुळे, भाजपचे किरण भोईर, सूरज मुठे आदी पंचविशी ते तिशीतल्या उमेदवारांचे नशीब यंदा फळफळले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे व भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात ही प्रमुख लढाई होत होती.यात शिवसेनेने बाजी मारली असून येत्या ९ मे पर्यंत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होतील.