कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हकालपट्टी केली. ही घटना ताजी असतानाच शिंदे शिवसेनेतील कल्याण ग्रामीण भागातील काही पदाधिकारी, माजी नगरसेवक उघडपणे ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांचा प्रचार करत आहेत. मग या बंडखोरांवर कारवाई करण्याची हिम्मत शिंदे शिवसेनेकडून का केली जात नाही, असा प्रश्न कल्याण ग्रामीणमधील निष्ठावान शिवसैनिक उपस्थित करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांना वेळोवेळी शिवसेनेने लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने प्रकाश म्हात्रे समर्थक आणि निष्ठावान शिवसैनिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रकाश म्हात्रे ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचा प्रचार करत होते म्हणून त्यांच्यावर कारवाई होते. मग, कल्याण ग्रामीणमधील शिंदे शिवसेनेतील काही पदाधिकारी, माजी नगरसेवक उघडपणे मशालीचा प्रचार करत आहेत, अशी निष्ठावान शिवसैनिकांमधील चर्चा आहे. या बंडखोरीने प्रचार करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई केली तर निवडणूक काळात जनतेत चुकीचा संदेश जाईल या भीतीने या बंडखोरीने प्रचार करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होत नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.

आणखी वाचा-साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस

राजेश मोरे डोंबिवली शहराचे शहरप्रमुख आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा निवडणूक लढवतील असे प्रकाश म्हात्रे, महेश पाटील, गुलाब वझे असे तगडे उमेदवार असताना शिवसेनेने शहरी भागातील राजेश मोरे यांना ग्रामीण भागातील उमेदवारी दिल्याने आणि ग्रामीण भागावर उमेदवार लादण्यात आल्याने ग्रामीणमधील शिवसैनिक खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाच वर्षापूर्वी रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना ग्रामीणमध्ये उमेदवारी देऊन शिवसेनेने जी चूक केली तीच चूक आता शिवसेनेच्या वरिष्ठांनी का केली, असे प्रश्न निष्ठावान शिवसैनिक उपस्थित करत आहेत.

भाजपमधील कल्याण ग्रामीणमधील काही कार्यकर्ते भाजपच्या बैठकीत महायुतीचे मोरे यांचा आम्ही प्रचार करत आहोत, असे सांगत आहेत. हीच मंडळी ग्रामीण मतदारसंघात मात्र मनसेच्या राजू पाटील यांचा सुप्त प्रचार करत असल्याची चर्चा आहे. कल्याण ग्रामीणमध्ये भाजपने मनसेला आणि मनसेने डोंबिवलीमध्ये भाजपला पाठबळ द्यायचे अशी ही समझोत्याची सुप्त निती असल्याची चर्चा ग्रामीण, डोंबिवलीत कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

आणखी वाचा-तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

या उलटसुलटच्या प्रचार नितीमुळे भाजप, शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्ता मात्र कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात आहे. या विषयावर शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते महायुती धर्म पाळत उमेदवारांचा प्रचार करत आहेत. कोणी बंडखोरीने चुकीचा प्रचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई करू असे शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and bjp activists are confused due to campaign confusion mrj