विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या दुराव्यामुळे निर्माण झालेले मतभेद पडद्याआड ठेवून शिवसेना-भाजपने राज्यात युती केली असली तरी, बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र, दोन्ही पक्षच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी ठरवण्याची चिन्हे आहेत. केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर बदलापूरमध्ये स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपने ‘मिशन ३५’ मोहीम आखून तयारी सुरू केली असतानाच, शिवसेनेतून भाजप नेते किसन कथोरे आणि राम पातकर यांच्यावर आगपाखड केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीत युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत या दोन पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण तसेच नवे नाही. मात्र, नगरपालिका निवडणुक तोंडावर असताना हे दोन पक्ष एकत्र लढणार का, याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना शिवसेना नेत्यांनी युती नकोच, असा नारा लावत टिकेची पहिली तोफ डागल्याने राजकारणाची दिशा हळुहळु स्पष्ट होऊ लागली आहे.
नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आमदार किसन कथोरे आणि भाजपचे राम पातकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली तरी बदलापूरात युती होऊ द्यायची नाही, असा चंग शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी बांधला आहे. बदलापूरात काँग्रेस पक्ष कमालिचा कमकुवत आहे. या पक्षाच्या जयश्री भोईर यांच्या रूपाने काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका आतापर्यत कार्यरत होत्या. गेल्या वर्षी शिवसेनेच्या साथीने त्या शहराच्या नगराध्यक्षा झाल्या आणि आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने आधीच कमकुवत असलेला काँग्रेस पक्ष बदलापूरातून हद्दपार झाला आहे.
दुसरीकडे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ३५ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले आमदार कथोरे यांनी ‘आमदार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीता सर्वाधिक २१ जागांवर विजय मिळवत भाजपने शिवसेनेसह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीलाही धक्का दिला. या पाश्र्वभूमीवर बदलापुरातही बहुमत मिळवण्याचा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा