कल्याण – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर फटाक्यांचे बेकायदा स्टाॅल लावण्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत. हे स्टाॅल हटविण्याचा प्रयत्न दोन दिवसांपासून पालिकेचे साहाय्यक आयुक्त करत आहेत. त्यांना पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून ‘राज्यात आमचे सरकार आहे. एकाही फटाक्यांच्या स्टाॅलला हात लावला तर बघून घेऊ,’ अशा धमक्या कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येत असल्याने या स्टाॅलवर कारवाई करायची कशी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील बाजारपेठांमध्ये फटाक्यांचे स्टाॅल नकोत म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहरातील ११ मैदानांवर फटाके विक्रीच्या स्टाॅलना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानां व्यतिरिक्त कोणीही विक्रेत्याने बाजारपेठांमध्ये फटाके विक्रीचे स्टाॅल लावले तर त्यांच्यावर अग्निशमन वाहनातून पाणी मारून संबंधित दुकान बंद पाडले जाणार आहे.डोंबिवली पूर्व भागात फ प्रभागात फडके रस्ता, नेहरू रस्ता परिसरातील फटाके विक्रीचे २० हून अधिक स्टाॅल शुक्रवारी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. पथक निघून गेल्यावर राजकीय मंडळींचा आशीर्वाद असलेल्या शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्रीतून स्टाॅल जैसे थे उभारले.
हेही वाचा >>>मध्य रेल्वेच्या ढिसाळपणामुळे प्रवासी मेटाकुटीला; रोजच्या ७० फेऱ्या रद्द, शेकडो लोकल विलंबाने
स्टाॅलवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वजित पवार यांच्या प्रतिमा आहेत. शिवसेना मध्यवर्ति शाखेसमोर भगवा कपड्याचा मंच उभारून फटाके विक्री सुरू आहे.
भागशाळा मैदानात परवानग्या
डोंबिवली पश्चिमेत भाजपचे प्रशांत पाटेकर उर्फ लारा यांच्या आशीर्वादाने रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर, रिक्षा वाहनतळ अडवून फटाके विक्रीचे स्टाॅल उभारण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरून स्टाॅल हटविण्याच्या आणि भागशाळा मैदानात परवानगी घेऊन स्टाॅल लावण्याच्या सूचना केल्या आहेत. ह प्रभागात फटाके स्टाॅलसाठी ९२ अर्ज दाखल आहेत. भागशाळा मैदानात जाणार असाल तरच परवानगी देण्याचा निर्णय करपे यांनी घेतला आहे.कल्याण पूर्व, पश्चिम, टिटवाळा भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर स्टाॅल लावण्यात आले आहेत. आयुक्तांनी सर्व बेकायदा फटाके स्टाॅलवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये कोंबडी-कुत्र्याच्या भांडणातून श्वान प्रेमीला मारहाण
ग प्रभागात कारवाई
डोंबिवली पूर्वेत ग प्रभागात फटाके विक्रेत्यांचे १७ स्टाॅल जमीनदोस्त करून मंडप साहित्य जप्त करण्याची कारवाई साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी, सुनील सुर्वे यांनी केली. कारवाई करताना काही राजकीय मंडळींनी अडथळे आणले. त्याला साहाय्यक आयुक्त देशमुख यांनी जुमानले नाही.
“ फटाके विक्री पालिकेने निश्चित केलेल्या मैदानावर केली पाहिजे. भाजप कार्यकर्त्यांनी वर्दळीच्या रस्त्यावर भाजप नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रतीमा लावून फटाके विक्री सुरू केली असेल तर त्यांंना समज देण्यात येईल.”-नरेंद्र सूर्यवंशीजिल्हाध्यक्ष,भाजप, कल्याण जिल्हा.
“ पालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊन आम्ही फटाके विक्रीचे स्टाॅल सुरू केले आहेत. ”-संतोष चव्हाण उपशहरप्रमुख,शिवसेना, डोंबिवली.