डोंबिवली – प्रसिध्द उद्योगपती, भारतरत्न रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या दुखवट्यानिमित्त आणि रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी भाजप, शिवसेनेतर्फे डोंबिवलीत आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव कार्यक्रमातील रास गरबा, दांडियाचा कार्यक्रम गुरुवारी रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपतर्फे डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात वातानुकूलित मंडपात दरवर्षीप्रमाणे यावेळी नमो रमो नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. या उत्सवानिमित्त दररोज संध्याकाळी सात वाजता आरती आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दांडिया, रास गरबा हे मनोरंजनाचे कार्यक्रम खेळले जातात. डोंबिवलीसह परिसरातून उत्साही महिला, पुरूष, मुले या कार्यक्रमात सहभागी होतात.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये चक्कीनाका येथे मोटारीच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी
अशाच पध्दतीने डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमधील ध. ना. चौधरी विद्यालयाच्या मैदानात कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो. येथेही दररोज आरती आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत रास गरबा, दांडियाचे उत्सवी कार्यक्रम केले जातात. येथेही शेकडो उत्सवी मंडळी दांडिया खेळण्यासाठी येतात.
हेही वाचा >>>घोडबंदर भागात विविध प्रकल्पांची आखणी
बुधवारी रात्री प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. या निधनानिमित्त राज्य शासनाने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच, रतन टाटा यांना आदरांजली वाहण्याचा भाग म्हणून गुरुवारी डोंबिवलीत भाजप, शिवसेनेतर्फे नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत होणारे रास गरबा, दांडिया कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. संध्याकाळी सात वाजताची फक्त आरतीचा कार्यक्रम फक्त पार पडणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. त्यानंतर होणारे मनोरंजनाचे सर्व खेळ बंद ठेवण्यात येणार आहेत.