उल्हासनगर : डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वादाला उल्हासनगर शहरात शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पूर्णविराम दिला आहे. सुरुवातीला शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातून भाजपाला डिवचल्यानंतर भाजपानेही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ५० कुठे आणि १०५ कुठे अशा आशयाचा बॅनर लावून भाजपाने शिवसेनेच्या ताकदीची खिल्ली उडवली होती. मात्र बुधवारी रात्री लावलेला भाजपाचा हा बॅनर रात्रीच एकाएकी गायब झाला. माध्यमातून चर्चेचा विषय ठरल्याने दुपारी शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत युतीमध्ये एकत्र काम करणार असल्याचे सांगत वादावर पडदा टाकला.
गेल्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवलीतील एका भाजपा पदाधिकाऱ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात उघड वाद निर्माण झाले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे भाजपाच्या अनेक आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी छाती ठोकपणे सांगितले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येत प्रतिक्रिया दिली होती. भाजपा पदाधिकाऱ्यांना इशारा देतानाच त्यांनी समोपचाराची भाषाही अवलंबली. त्यातच तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर छापून आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे या जाहिरातीवरून भाजपात अस्वस्थता पसरली.
हेही वाचा – कल्याणमध्ये तीन तासात दोन महिलांची मंगळसूत्र लांबवली
दुसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आणखी एक जाहिरात देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न झाला. मात्र भाजपाच्या वतीने यावर टीका केली गेली. उल्हासनगर शहरात दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने भाजपाला डिवचणारी जाहिरात बॅनरच्या माध्यमातून झळकवण्यात आली. कमजोर शिकायत करते है असा आशय या बॅनरवर देण्यात आला होता. तर दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या वतीने ५० कुठे आणि १०५ कुठे असा खोचक सवाल करणारा बॅनर लावला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यात किंगमेकर असल्याचे या जाहिरातीतून ठळकपणे दाखवण्यात आले होते. मात्र रात्री भाजपाने लावलेला हा बॅनर अचानक गायब झाला. त्यावरून भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर शहरातील राजकारणात अनेक तर्क वितर्क व्यक्त केले गेले. मात्र शिवसेना आणि भाजपा युतीची बदनामी होत असल्याचे समोर येताच शहरातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. वेगाने सूत्रे हलली आणि स्थानिक भाजपा आमदार कुमार आयलनी यांच्या कार्यालयात बैठक सुरू झाली. यात शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष अरुण आशान सहभागी झाले. या बैठकीनंतर जे झालं ते झालं मात्र शिवसेना भाजप एकत्र आहे. युती एकत्रपणे काम करेल असे भाजपा जिल्हाध्यक्ष जमणू पुरस्वानी यांनी दिली. तर भाजपासोबत यापूर्वीही चांगलेच संबंध होते पुढेही राहतील आम्ही युतीत एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांनी दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना भाजपा वाद किमान उल्हासनगर शहरात तरी संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.