लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना सोमवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून सुस्थितीत झाल्याने घरी सोडण्यात आले. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर २ फेब्रुवारीपासून महेश गायकवाड ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते.
महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सोडण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारपासून त्यांचे समर्थक कार्यकर्ते महेश यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करत होते. महेश गायकवाड यांचे कल्याण पूर्वेतील तिसगाव भागातील जनसंपर्क कार्यालय, घराचे प्रवेशव्दार झेंडुच्या फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर महेश गायकवाड यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तेथे डोंबिवलीचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
आणखी वाचा-डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील बेकायदा इमारत भुईसपाट, ‘फ’ प्रभागाची आक्रमक कारवाई
दुर्गाडी किल्ला ते कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांच्या घरापर्यंत वाघ आला रे वाघ आला, भावी आमदार, गरीबांचा कैवारी आला, अशा आशयाचे फलक समर्थकांनी झळकविले. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या स्वागतासाठी दुर्गाडी किल्ला येथे शेकडो समर्थक जमले होते. जनसंपर्क कार्यालयाबाहेर परिसरातील रहिवाशांनी तुडूंब गर्दी केली होती. दुर्गाडी किल्ला येथे महेश गायकवाड यांचे बीएमड्बल्यु वाहनातून आगमन होताच फटाक्यांची आताशबाजी, पुष्पवृष्टी करून, पुष्पगुच्छ देऊन महेश यांचे जोरदार, घोषणांनी स्वागत करण्यात आले.
महेश गायकवाड यांच्या वाहनाच्या पुढेमागे पोलीस, त्यांच्या समर्थकांची १० ते १५ वाहने होती. कल्याण शहरात प्रवेश केल्यावर अनेक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महेश यांचे शहरात आगमन झाल्याने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यांचे कल्याण पूर्वेतील जनसंपर्क कार्यालयात आगमन झाल्यावर महिलांनी त्यांचे औक्षण केले. कार्यालय परिसर वाद्यांचा दणदणाटी आवाज, घोषणांनी दुमदुमुन गेला होता.