विशिष्ट समाजाची मते मिळण्यासाठी भारतरत्न देण्याची मागणी; विरोधकांची टीका
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी पुढे करत शिवसेनेने सुरू केलेल्या मोहिमेचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. डोंबिवलीतील एका विशिष्ट समाजातील मतांवर डोळा ठेवून ही मोहीम आखण्यात आल्याची चर्चा रंगली असून विकासकामांच्या मुद्दय़ावरून अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते ही मोहीम राबविताना विशेष स्वारस्य घेताना दिसू लागले आहेत.
सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या मागणीसाठी शिवसेनेने कल्याण- डोंबिवलीत स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे नेतृत्व पालकमंत्री एकनाथ िशदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत स्वत: करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेले खासदार िशदे यांच्या कार्यपद्धतीविषयी कल्याण-डोंबिवलीत फारसे सकारात्मक बोलले जात नाही. शिवसेनेच्या एका वर्तुळातही त्यांच्याविषयी दबक्या आवाजात नाराजीचे सूर व्यक्त होऊ लागले असतानाच सावरकर स्वाक्षरी मोहिमेचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत विकास कामांच्या आघाडीवर शिवसेनेचे अपयश लपून राहिलेले नाही. रस्ते, उड्डाण पूल, कचरा व्यवस्थापन अशा कामांचे बारा वाजले असताना शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर सावरकर प्रेमाचा आलेला उमाळा अनेकांना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे. भ्रमणध्वनीवर मिसकॉल द्या आणि सावरकर मोहिमेला पािठबा द्या, असा उपक्रम शिवसेनेने कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून येथील हिंदुत्ववादी मतदारांना खूश करण्याची क्लृप्ती शोधली आहे, अशी टीका विरोधकांनी शिवसेनेच्या या मोहिमेवर सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा