बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर आता भाजप आमदार आणि उमेदवार किसन कथोरे यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख तेजस म्हस्कर यांनी बुधवारी कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे एकेकाळी जवळचे असलेले आणि त्यांच्या प्रभावक्षेत्रात असलेले म्हस्कर भाजपात गेल्याने वामन म्हात्रेंना हा मोठा धक्का मानला जातो. वामन म्हात्रे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने कथोरे यांनी म्हात्रे यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जाते.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. विद्यमान भाजप आमदार आणि महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपातील माजी खासदार कपिल पाटील आघाडीवर होते. त्यातच उमेदवारीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. ते आता कथोरे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवणार आहेत. त्यातच शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये रिक्षेच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी
लोकसभा निवडणुकीनंतरपासूनच म्हात्रे यांनी किसन कथोरे यांना विरोध सुरू केला होता. भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता वामन म्हात्रे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र कथोरे यांना आव्हान देत असतानाच कथोरे यांनीच शिवसेनेला आणि विशेषतः वामन म्हात्रे यांना जोरदार धक्का दिला आहे. बुधवारी शिवसेनेचे उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. तेजस म्हस्कर हे एकेकाळी वामन म्हात्रे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. म्हस्कर यांच्या राजकारणाला म्हात्रे यांनीच उभारी दिल्याचे बोलले जाते. मात्र मध्यंतरीच्या काळात म्हात्रे आणि म्हस्कर यांच्या दुरावा आला होता. आता म्हस्कर यांनाच थेट कथोरे यांनी गळाला लावल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. म्हस्कर वालिवली आणि मांजर्ली या भागातून पालिका निवडणुकांसाठी तयारीत आहेत. येथे त्यांचे काही अंशी वर्चस्व आहे. त्यामुळे कथोरे यांनी म्हस्कर यांचा प्रवेश केल्याने म्हात्रे यांच्या प्रभाव असलेल्या भागात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. या प्रवेशामुळे महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचेही समोर आले आहे.
आम्ही विकासाच्या विचारांनी एकत्र
या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना किसन कथोरे यांनी आम्ही महायुती म्हणून एकच असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच मी उद्या अर्ज भरणार आहे. तेजस आमच्या परिवारातला मुलगा असून त्याच्या वडिलांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला साथ देण्यासाठी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा. आमची ताकद वाढली आहे. दररोज शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. नुकतेच मुस्लिम बांधवांचेही प्रवेश झाले. ही वेगळ्या विजयाची नांदी आहे, असे यावेळी कथोरे म्हणाले. तसेच हा कुणाला धक्का देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही विचारांनी एकत्र येत आहोत. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. मी अर्ज भरण्यासाठी सगळ्यांना निमंत्रित करणार आहे, असेही कथोरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा…१५ वर्षांत न फुटलेले नारळ १५ दिवसांत फुटले, सुभाष पवार यांचा किसन कथोरेंवर हल्लाबोल
त्यांनाही आमंत्रित करणार
अर्ज भरताना मी सर्वांना वैयक्तिक आमंत्रण देणार आहे. महायुतीतील अपक्ष म्हणून कुणी लढणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केली असेल. तो त्यांचा अधिकारी आहे, असे सांगत कथोरे यांनी म्हात्रे यांच्यावर अधिक बोलणे टाळले