कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवाराला मतदान करत शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने डोंबिवली नव्हे, तर ठाण्यासह संपूर्ण जिल्ह्य़ातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे भाजप दिवसेंदिवस शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी शोधत असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ भाजप नगरसेवकाच्या गळय़ात घालण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
कल्याण महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करू नये, असा मतप्रवाह भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे संधी मिळेल तिथे शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याची झलक दाखवली. मात्र, सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे सारे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यावरच केंद्रित झाल्याची चर्चा आहे.
शिंदे यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ खात्याला किती निधी पुरवायचा यावर मुख्यमंत्र्यांचेच नियंत्रण असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खूश ठेवण्यासाठी भाजपचे लाड पुरवण्याची रणनीती सेनेच्या काही नेत्यांनी आखली आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपचा अवघा एकमेव नगरसेवक असताना निवडणुकीसाठी युती करताना भाजपला ४३ जागा सोडून याच प्रेमाची प्रचिती देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
शिंदेशाहीच्या भाजपप्रेमाचे दर्शन ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही घडण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजपचे संजय वाघुले यांची निवड करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. स्थायी समितीत भाजपचा अवघा एक सदस्य असताना शिवसेनेच्या सात सदस्यांना भाजपला मतदान करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे भाजप सेनेला ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना त्या पक्षालाच जवळ करण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नावर शिवसेनेत नाराजी आहे. ठाण्यातील बी केबिन भागातील अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईविरोधात मध्यंतरी स्थानिक शिवसैनिकांनी भाजप नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढाच पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यापुढे वाचल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांनी या तक्रारीकडे चक्क दुर्लक्ष केले.
जयेश सामंत, ठाणे
शिंदेंच्या भाजप‘प्रेमा’ने शिवसेनेत अस्वस्थता
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवाराला मतदान करत शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने डोंबिवली नव्हे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 15-04-2015 at 12:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena discomfort over eknath shinde bjp fever