कल्याण –  मागील वीस वर्षाच्या कालावधीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार बदलाची परंपरा यावेळी कायम राखली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित आमदार मनसेचे राजू पाटील यांना शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कडवी लढत देऊन मागे टाकले आहे. महायुतीचे राजेश मोरे यांना स्पर्धक उमेदवारांपेक्षा मिळालेल्या मताधिक्यावरून ते या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे चित्र आहे.

मागील पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी कधीही एकाच आमदाराला कायम ठेवण्याची परंपरा जतन केलेली नाही. त्यामुळे यावेळीही कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी कल्याण ग्रामीणमध्ये नवख्या असलेल्या डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना आपलेसे करून स्पर्धक उमेदवारांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळून दिले आहे.

हेही वाचा >>>मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले, ५० हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी

कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील यांच्यातच चुरशीची लढत होण्याची चिन्हे होती. परंतु आयत्यावेळी शिंदेसेनेने राजेश मोरे यांना कल्याण ग्रामीण मधून उमेदवारी देऊन पाटील आणि भोईर यांची गणिते बिघडून टाकली. राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक असल्याने शिंदे पिता-पुत्रांनी त्यांना चांगलेच पाठबळ दिल्याची चर्चा होती. 

राजेश मोरे यांच्या विजयासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमध्ये तळ ठोकल्याने मोरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. मोरे यांच्यामुळे शिंदे सेना आणि ठाकरे गटातील शिवसेना मतदारांचे विभाजन झाले. भाजपने खुलेआमपणे मनसेच्या राजू पाटील यांना साथ देऊनही पाटील या मतदारसंघावरील आपली मक्तेदारी कायम ठेवण्यास कमी पडले.

हेही वाचा >>>Kalyan East assembly elections: कल्याण पूर्वेत मतदारांचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराकडे दुर्लक्ष? सुलभा गायकवाड यांची विजयाकडे वाटचाल

भोईर आणि पाटील यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये मतदारांची जी बेगमी केली होती ती फोडण्यात खासदार शिंदे यांना यश आले. मोरे यांना ग्रामीण मध्ये उमेदवारी दिल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांची दानत काढली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना धडा शिकवण्याचा विडा उचलला होता. कोणत्याही परिस्थितीत आमदार पाटील यांना या भागाचे पुन्हा नेतृत्व संधी मिळू नये याच इर्षेतून झालेल्या तुल्यबळ लढतीत राजकीय आखणीकरांच्या नजरेत नसलेले, मतदारांच्या मनात नसलेले राजेश मोरे अचानक कल्याण ग्रामीण मध्ये मताधिक्य मिळून स्थानिक दोन्ही भूमिपुत्र उमेदवारांना शह देऊन पुढे गेले आहेत. राजेश मोरे यांना मिळालेल्या मताधिक्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी कल्याण ग्रामीण मतदारसंघाने शिवसेनेचे रमेश म्हात्रे या शहरी उमेदवाराला दोन वेळा पराभूत केले होते. बाहेरचा उमेदवार म्हणून मोरे यांच्या बाबतीतही तशीच पुनरुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या खेळीमुळे ग्रामीणचे स्थानिक उमेदवारांचे सगळेच आखाडे मोडून पडले.यापूर्वी रमेश पाटील, सुभाष भोईर यांनी अलटून पालटून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

(राजेश मोरे)