बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते कमालीचे अस्वस्थ बनले आहेत. गेली २० वर्षे अंबरनाथ नगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेत असलेली अंतर्गत गटबाजी सर्वश्रुत असली तरी यंदाच्या निवडणुकीत भाजपचे आव्हान असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात हा संपूर्ण परिसर मोडत असल्याने पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासाठी अंबरनाथची निवडणूक तर जिव्हाळ्याची ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीची गंभीर दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाल्याने शिवसेनेपुढील चिंता वाढली आहे. या बंडोबांना आवरण्याचे मोठे आव्हान सेना नेत्यांपुढे अहे. इतर पक्षांच्या तुलनेत सेनेत बंडखोरांची संख्या अधिक असून सध्या त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
शिवसेनेच्या पूर्व आणि पश्चिम विभागातील संघटनेतील नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. त्यातूनच निवडणुकीत परस्परविरोधी गटाचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्नही केला जातो. यंदा शहरातील या पक्षांतर्गत कुरबुरीची कुणकुण थेट मातोश्रीपर्यंत पोचली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना खडसावल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने कामाला लागा, असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा फारसा प्रभाव नाही. त्यातही यंदा हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सरस ठरलेला मित्रपक्ष भाजप हेच शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.भाजपचे हे आव्हान मोडीत काढून अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी जिल्ह्य़ातील पक्षाची सारी यंत्रणा प्रचारात उतरवली जाणार आहे. यासाठी खासदार आणि आमदारांनी जातीने लक्ष घालून शिवसेनेकडे विजयश्री खेचून आणण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे.

परतफेडीस उत्सुक
पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर विधानसभा निवडणुकीतील पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुकांमध्ये या पराभवाची परतफेड करण्यास सेनानेतृत्व उत्सुक आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपला फारशा जागा जिंकू द्यायच्या नाहीत, अशी रणनीती आखण्यात येत आहे. जिल्हा पातळीवर अशा प्रकारची व्यूहरचना सुरू असताना अंबरनाथमध्ये मात्र पक्षातील विविध गट एकमेकांनाच शह देण्यात मश्गूल असल्याने पालकमंत्र्यांचा पारा चढल्याचे बोलले जाते.