निवडणुकीमुळे विकासकामांच्या लोकार्पणाबाबत अनिश्चितता
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता झाल्याने महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विविध विकासकामांचा धडाका लावून देण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेची मोठी कोंडी झाली असून शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. महापालिकेमार्फत शहरात उभारण्यात येत असलेले रस्ते, कळवा खाडी पूल, घोडबंदर मार्गावरील जुने ठाणे- नवे ठाणे प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी उद्धव यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम आचारसंहितेमुळे अडचणीत आले आहेत.
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पुढील महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विविध विकासकामांचे शुभारंभ सोहळे आयोजित करण्याचा धडाका सुरू केला आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आखण्यात आलेल्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या विकासकामांचा उद्घाटन सोहळा बुधवारी शरद पवार यांच्या हस्ते सोहळा उरकण्यात आला. आठवडय़ाच्या अखेरीस निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने शुक्रवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यांचे आयोजन केले आहे.
जय्यत तयारी
महापालिका वर्तुळात या कार्यक्रमांची एकीकडे जय्यत तयारी सुरू असताना शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारपासून जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत केवळ शिक्षक मतदार असल्यामुळे महापालिकेच्या लोकार्पण सोहळ्यांना त्यातून सूट द्यावी, अशी विनंती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असली तरी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमांना हिरवा कंदील दाखविला नसल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.
स्मारक सोहळाही अडचणीत
कल्याणमधील काळा तलावाच्या काठावर उभारण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शुभारंभ सोहळाही आचारसंहितेमुळे रद्द होण्याची चिन्हे आहेत. मुंबई, ठाणे पालिका निवडणुकीपूर्वी येत्या शनिवारी या स्मारकाचे उद्घाटन करून जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा बेत शिवसेनेने आखला असला तरी हा कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडल्याने शिवसेना नेत्यांची गुरुवारी एकच धांदल उडाली. या उद्घाटन कार्यक्रमाला परवानगी देण्याची मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यातर्फे गुरुवारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सेनेचे शिष्टमंडळ गेले होते, पण परवानगीचा अधिकार आपला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. परवानगीच्या विषयावर आयोग शुक्रवारी निर्णय घेणार आहे, असे देवळेकर यांनी सांगितले.