डोंबिवली : दिवा परिसरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या फलकावरुन शिवसेनेने राज्यातील सत्तासहयोगी मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डोंबिवलीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या फोटो गायब केल्याने येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढा जाहीर अपमान शिवसेनेकडून हेतुपुरस्सर केला जात असेल तर, मंत्री चव्हाण यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असा रेटा येथील भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांच्या मागे लावला असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षापासून कल्याण-ड़ोंबिवलीतील विकास कामे, पालिकेतील कामे अशा अन्य विषयांवरुन भाजपचे स्थानिक आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांची शिंदे पिता-पुत्र विशेष करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर जोरदार धुसफूस सुरू आहे. मंत्री चव्हाण, आ. पाटील यांच्यापेक्षा मीच कसा विकास पुरूष आहे हे दाखविण्याचा खा. शिंदे यांचा सततचा प्रयत्न भाजप, मनसे कार्यकर्त्यांना सलत आहे. आपल्या मगदुराप्रमाणे प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात काम करत असताना खा. शिंदे आमच्या मतदारसंघात का लुडबुड करतात. त्यांनी विकास निधी आणून कामे केली असतील तर जनहिताची कामे करताना त्यांनी त्याचा फार गवगवा करू नये, असे मंत्री चव्हाण, आ. पाटील समर्थकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> आता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकार देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि…

हा कलगीतुरा मागील वर्षभरापासून जोरात सुरू असताना दिव्यातील विकास कामांच्या उद्घाटन फलकावर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नामोल्लेख, फोटो नसल्याने डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला आणि मंत्री चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघात शिवसेनेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकनाथ म्हणून जयघोष करणारे फलक लावले आहेत. हे फलक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहेत. बुधवारी सकाळपासून याच फलकांची चर्चा डोंबिवलीत सुरू आहे.

हेही वाचा >>> अमरावती : डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पन्नास टक्के पदे रिक्त

मंत्री चव्हाण यांना ‘ठसन’ देण्यासाठी अशाप्रकारचे फलक लावून शिवसेनेने सत्तासहयोगी मित्रांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. त्याची जबरदस्त किमत मोजायला लावू, अशी आव्हानात्मक भाषा भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. भाजपचे डोंबिवलीचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर मुख्यमंत्री सुपुत्राच्या इशाऱ्यावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे. त्यात शिवसेनेने आता फलकांवर भाजप नेत्यांना डावलून भाजपची खोडी काढण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे.

दिव्यात शिवसेना-भाजपचे सख्य काय आहे. हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे ते कार्यक्रमाला आमंत्रण देऊन येतील की नाही याची शाश्वती नाही. फलक हे शिवसेनेने लावले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच नेत्यांची नावे त्यावर असणार, असे दिव्यातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेचे डोंबिवलीतील पदाधिकारी असा जोरदार सामना समाज माध्यमांमध्ये रंगला आहे. त्यात आज सकाळपासून भाजप, शिवसेना यांच्यात जोरदार धुसफूस सुरू झाली आहे. या सगळ्या प्रकारावरुन मंत्री रवींद्र चव्हाण दिव्यातील कार्यक्रमाला उपस्थितीत राहतात की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena in dombivli devendra fadnavis ravindra chavan no photos on banner ysh