ठाणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी मिळणार असून आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करा, असे भाजपाचे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्यापूर्वीच सांगत होते. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला असला तरी हा निकाल कोणत्या तरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रविवारी ठाण्यातील मेळाव्यात बोलताना केला. निवडणूक आयोगाने घटनेचा, लोकशाहीचा, संविधानाचा आणि शिवसेनेचा विश्वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत जी घटना कधीच घडली नव्हती, अशी घटना लोकशाही असलेल्या देशामध्ये घडली आहे. शिवसेनासारख्या मूळ पक्षाच नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले आणि ज्यांनी पक्षातून बंडखोरी आणि गद्दारी केली त्यांनाच चिन्ह आणि नाव देण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “आमच्या ३२ वर्षीय नेत्याला महाराष्ट्रातून निमंत्रण, तुमच्या ३२ वर्षीय नेत्याला कोण बोलवतं?” भास्कर जाधवांचे प्रकाश महाजनांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँगेस पक्ष सोडला. पण त्यांनी कधी काँग्रेस पक्षावर किंवा चिन्हावर आपला हक्क सांगितला नाही. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. देशात यापूर्वी पक्षात असे वाद झाले. त्यावेळेस गद्दारी करणाऱ्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले नाही. वाद मिटलेच नाहीतर नाव आणि चिन्ह गोठविण्यात आले, असेही जाधव म्हणाले. काळ कठीण आहे. शासकीय स्वायत्त संस्थांना स्वतंत्र अधिकार आहेत. पण त्या कुणाच्यातरी बटीक झाल्यामुळे न्याय मिळत नसल्याने शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. खचून जाऊ नका. भांडवल करू नका. आपल्याला ही लढाई विचारांसाठी लढायची आहे. जिकायची आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

एकनाथ शिंदे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही. ही लढाई तत्त्वांची आहे. तत्त्वांच्या लढाईत सख्खा भाऊ जरी आला तरी त्याला सोडता कामा नये, असे धर्मशास्त्र सांगतात. आमची तत्त्वांची लढाई आहे, असेही जाधव यांनी सांगितले. सम्राट पृथ्वीराज चौहान चित्रपटात ज्याप्रकारे जयचंद राठोड यांची जशी अवस्था झाली. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा जयचंद राठोड झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपा तुमचा जयचंद राठोड करेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – आनंद आश्रमाचा यांनी बाजार केलाय, केदार दिघे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी आपली दोन मुले गमावल्याचा प्रसंग दाखविला आहे. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असा तो प्रसंग आहे. दोन दोन मुलं ज्याला गमवावी लागली, त्याचे दुःख काय असते, हे आम्ही समजू शकतो. कुणासोबतच असा प्रसंग घडू नये. त्या प्रसंगानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्हाला सावरलं. तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं. पण आज बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या मुलाला दुःखात ढकललं. कुठं फेडाल हे पाप? असा प्रश्न उपस्थित करत भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोरदार हल्ला केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader bhaskar jadhav criticize election commission in thane ssb