कल्याण – अपक्ष म्हणून कल्याण पूर्व भागाचे नेतृत्व करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड हे नेहमी राजकारणात सोयीप्रमाणे वागत आले आहेत. पाच वर्षापूर्वी ते संधी साधून भाजपमध्ये आले. ते मूळ भाजपचे नाहीत. तसे संस्कार त्यांच्यावर नाहीत. ते भाजपचे असते तर एवढे कटकारस्थान करून माझ्या बरोबर निर्घृणपणे वागले नसते, असा घणाघात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सोमवारी येथे माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांच्यावर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आदिवासी जमिनीवरील १७ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त; देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भिवंडी तहसीलदारांची कारवाई

माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे आमदार गायकवाड स्वता हडप करण्याच्या प्रयत्नात होते. गरीब शेतकऱ्यांना आमदार गायकवाड दाद देत नव्हते. त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या बाजुने उतरलो तर आपल्यावर अशी गोळ्या झेलण्याची वेळ आली. येत्या काळात आपण न्यायालयीन लढा लढून आमदार गायकवाड यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत. अशी वेळ पुन्हा कोणा सामान्यावर येणार नाही यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत, असे शहरप्रमुख गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “आमदार गणपत गायकवाड यांनी रचलेलं षडयंत्र…”, रुग्णालयातून बाहेर येताच महेश गायकवाड म्हणाले…

कल्याण पूर्वेतील नागरी समस्या मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करत होतो. विकास कामे करत होतो. या प्रत्येक कामात आमदार गायकवाड अडथळे आणत होते. माझ्या खासगी कामात त्यांनी अडथळे आणले. आमच्यात या विषयांवरून वाद होत होते. पण ते एवढे निर्घृणपणे कटकारस्थान करून वागतील, असे वाटले नव्हते, असे शहरप्रमुख गायकवाड यांनी सांगितले. आमदार गायकवाड यांच्याकडून होणाऱ्या त्रासाविषयी आपण भाजप, शिवसेनेच्या वरिष्ठांना सांगितले होते. प्रत्येकाने आपण युतीत आहोत. वाद नको म्हणून मला शांत राहण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आई वडील, गरीबांचे आशीर्वादामुळे आपण उभे आहोत. प्रत्येकाला परिवार असतो. आपण ठिक नसतो तर आपल्या परिवाराची काय अवस्था झाली असती. आपला सामाजिक कार्याचा लढा सुरूच राहील, त्यात खंड पडणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader mahesh gaikwad slams bjp mla ganpat gaikwad after discharge from hospital zws