डोंबिवली – सत्तास्थानी असलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांना जनतेचे प्रश्न, सामाजिक प्रश्नांचे काही पडलेले नाही. ही मंडळी खंडणी, लुटमार, जमिनींचे व्यवहार, व्यवहारांमधील हिस्से यामध्ये मग्न आहेत. यामधूनच उल्हासनगर मधील गँगवारची घटना शिवसेना, भाजप या महायुतीच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये घडली आहे. हा सगळा स्वार्थींचा खेळ आहे, अशी टीका उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (शिवसेना) नेते संजय राऊत यांनी शनिवारी येथे एका शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमानंंतर माध्यमांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात, त्यांचे बाळराजे सुपुत्र खासदार यांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार होतो. हे चित्र संपूर्ण देशाने ,पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहिले. याच मंडळींनी मोठ्या हिमतीने जे खोक्यांचे राज्य निर्माण केले. तेथे चाललय काय असा प्रश्न उल्हासनगर मधील गोळीबाराची घटना पाहून देश करत आहे. हा सगळा प्रकार पाहून थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर देशाच्या गृहमंत्री यांनी राज्याच्या गृहमंत्री यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>>गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करणार
भाजपचा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असलेल्या पदाधिकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार करतो. म्हणजे महायुतीत कसे गँगवार सुरू आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा सगळा प्रकार खंडणी, जमीन व्यवहार, जमीन व्यवहारातील हिस्सा, लुटमार यासाठी सुरू आहे. यामध्ये सामान्य जनता, त्यांचे प्रश्न याविषयी या मंडळींंना काहीही पडलेले नाही, असे राऊत यांनी सांगितले.
डोंबिवली, कल्याण मधील लोक सुज्ञ आहेत. निवडणुका तुम्ही हिमतीने घेत आहात. उद्याच्या निवडणुकीत या मंडळींना त्याची किंमत चुकवावीच लागेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.