नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची की जिल्ह्यातील शिंदे यांना पाठिंबा द्यायचा या विवंचनेत असलेल्या शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची आता धावाधाव पहायला मिळते आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, नेते यांनी मातोश्री वर उपस्थिती लावत आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. तर दुसऱ्याबाजूला आम्ही आपल्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देखील ते फोन करत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातही प्रचंड उलथापालथ होताना दिसते आहे. ठाणे, डोंबिवली शहरामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यासाठी तसे फलकही त्यांनी शहरांमध्ये झळकवले. तर मंगळवारपासून समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांना समर्थन करणारे संदेश प्रसारीत केले जात आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी थेट भूमिका न घेता आस्ते कदमचे धोरण स्वीकारले आहे. मात्र जिल्ह्यातील आणि सर्वच शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आता आपली निष्ठा नक्की कुणाकडे दाखवण्याची वेळ आली आहे. भविष्यातील राजकारण आणि एकनाथ शिंदे यांच्या पाऊलांचा नक्की अंदाज येत नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.
आम्ही आताच भूमिका घेणे भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते –
उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या पालिकांच्या लवकरच निवडणुका आहेत. तर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रसंगी शहरात कुणाचे प्रतिनिधित्व करायचे यावरून गोंधळ आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरप्रमुखांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या भेट घेत आम्ही तुमच्यासोबत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी याची माहिती एकनाथ शिंदे यांना मिळण्यापूर्वीच या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच एकनाथ शिंदे यांना फोन करून आम्ही मात्रोश्रीला भेट देऊन आल्याची माहिती दिल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. आपण आपला निर्णय पक्का करा, आम्ही पक्ष आणि आपल्यासोबत असू असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे कळते आहे. आम्ही आताच भूमिका घेणे भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते, असेही या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे कळते आहे.
याबाबत सध्याच्या घडीला उघडपणे पदाधिकारी बोलताना दिसत नाहीत. मात्र आताच भूमिका घेणे टाळत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना दिलासा देत पाठिंबा असल्याची दुहेरी खेळी पदाधिकारी करताना दिसत आहेत.