ठाण्यात ७० हजार वडापाव, नवी मुंबईत ३५ हजार थाळी कांदेपोहे

ठाणे जिल्ह्यातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला पडद्यामागून मदत करणाऱ्या शिवसेनेने यंदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात थेट उडी घेतली आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येऊ घातलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर ३५ हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने या कामात लक्ष घातले असून ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ  अधिकाऱ्यांनाही आवश्यक ‘रसद’ उभी करण्यास जुंपण्यात आल्याची चर्चा आहे.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने बुधवारी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तब्बल २५ लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. यापूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता बुधवारी मुंबईत निघणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

राज्यभरात आतापर्यंत निघालेल्या मराठा मोच्र्यामध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी सहभाग घेतला होता. परंतु मोच्र्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव लागू नये, यासाठी मोर्चेकऱ्यांनी नेहमीच खबरदारी घेतली होती. मात्र यंदा शिवसेनेने मराठय़ांच्या आंदोलनात आपला सहभाग अधिक ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोच्र्यासाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पोटपूजेची सोय करून शिवसेनेने त्यांची मने जिंकण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. बुधवारी सकाळपासूनच मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई-ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाका येथे शिवसेनेने मोर्चेकऱ्यांसाठी वडापाव आणि चहाची खास व्यवस्था केली असून गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना येथील व्यवस्थेच्या कामात जुंपले असल्याचे चित्र आहे.  या आयोजनासाठी आवश्यक असणारी ‘रसद’ उभी करण्यासाठी पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपण्यात आल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत करावे येथील तांडेल मैदानात मोर्चेकऱ्यांसाठी कांदापोहे, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे स्थानिक नेते विजय चौगुले यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मराठा मोर्चा हा कोणत्याही एका पक्षाचा नसला तरी ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने प्रयाण करणाऱ्या मोर्चेकऱ्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी महापालिकेतील सत्ताधारी या नात्याने शिवसेनेने पुढाकार घेणे स्वाभाविक म्हणायला हवे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे, नवी मुंबईत मोर्चेकऱ्यांची न्याहारीची जबाबदारी शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली आहे.

– संजय मोरे, माजी महापौर ठाणे

मराठा मोर्चात सर्वच पक्षांनी आपला सहभाग दर्शवला आहे. ठाण्यातील शिवसेनेत मराठा समाजाचे प्रमाण जास्त असल्याने मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चाच्या आयोजनात या पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय दिसत आहेत. ठाणे शहरातून दीड ते दोन लाख मराठा समाजातील नागरिक मोर्चासाठी मुंबईकडे रवाना होतील, असा अंदाज आहे.

–  राजेंद्र साळवी, चिटणीस, अखिल मराठा फेडरेशन

Story img Loader