शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर अडचणीत ?
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे ठाण्यातील चार नगरसेवकांसह सर्व पक्षातील बडय़ा नेत्यांची नावे पुढे येत असतानाच दिवा परिसरात तब्बल २५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका हत्येच्या गुन्ह्य़ाचा ठाणे पोलिसांनी उलगडा केला आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासामुळे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर हे अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गुन्ह्य़ात पूर्वी आमदार भोईर यांना अटक झाली असून या प्रकरणातून ते दोषमुक्त झाले आहेत. मात्र, ठाणे पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास नव्याने सुरू केल्याने भोईर यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा आमदार भोईर यांनी केला आहे.
दिवा येथील साबा गावात राहणारे बाळाराम रामभाऊ म्हात्रे यांची २५ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येनंतर त्यांचा अंगरक्षक आणि त्याचे साथीदार फरार झाले असून गेली २५ वर्षे हे सर्वजण पोलिसांना चकवा देत होते. याप्रकरणी बाळाराम यांच्या मेहुणीने दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हा गुन्हा उघडकीस येत नसल्यामुळे तात्पुरता बंद करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्य़ातील आरोपींच्या मागावर पोलीसपथके होती. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना या प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्य़ात जाऊन ही कारवाई केली. या जिल्ह्य़ातील औरांव गावातून पथकाने बाळाराम यांचा अंगरक्षक विजयसिंग ऊर्फ अनिल रामसागर चौबे याला मोठय़ा शिताफीने अटक केली. औरांव गावात त्याने स्वत:चा राजकीय दबदबा निर्माण केलेला आणि तो गेली काही वर्षे गावाचा सरपंचही होता, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांनी दिली.
बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येचा गुन्हा गेली २५ वर्षे उघडकीस आला नव्हता. मात्र, त्या वेळी शत्रुत्व असल्याच्या संशयावरून आमदार सुभाष भोईर यांच्यासह तिघांना अटक झाली होती. तपासादरम्यान ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे तिघांना दोषमुक्त करण्यात आले होते. या गुन्ह्य़ात २५ वर्षांनंतर बाळाराम यांचा अंगरक्षक विजयसिंगला अटक करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुनाच्या कटाचे सूत्रधार आणि अन्य आरोपींबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती नागेश लोहार यांनी दिली.
गुंड टोळ्यांच्या वादातून हत्या..
ठाणे, मुंब्रा तसेच दिवा या भागात ८० च्या दशकात रामचंद्र भगत ऊर्फ पिंटय़ा दादा आणि गोवर्धन म्हात्रे ऊर्फ गौऱ्या दादा यांच्यात वाद झाले होते. यातूनच नौपाडा येथील आराधना टॉकीज येथे पिंटय़ा दादा व त्याच्या साथीदारांनी गौऱ्या दादाची चॉपर आणि चाकूने हत्या केली होती. या हत्येनंतर १९८३ मध्ये गौऱ्या दादाचा भाऊ बाळाराम म्हात्रे याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील महंमद काल्या आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पिंटय़ा दादाची हत्या करून बदला घेतला होता. मुंब्रा रेतीबंदर भागात पिंटय़ा दादाची गाडी अडवून त्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हत्येनंतर पुढील सात वर्षे दोन्ही टोळ्यांमध्ये सुडाचे भावनेतून हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. यातूनच १६ मार्च १९९० मध्ये बाळाराम म्हात्रे यांची हत्या झाली आणि त्यानंतर सूडनाटय़ शमले होते, अशी माहिती नागेश लोहार यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा