मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी साथ दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सत्ता गेल्यामुळे शिवसेना पक्षाला स्थानिक पातळीवर ओहोटी लागली आहे. शिवसेनेचे नगरसेवक, कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाकडून बंडखोरांविरोधात कठोर पावलं उचलली जात आहे. शिवसेनेने कल्याणधील आमदार विश्वनाथ भोईर यांची शिवसेना शहरप्रमुखपदावरुन हकालपट्टी केली आहे. याआधी शिवसेनेने आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा >> चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “संजय राऊत बावचळले आहेत, त्यामुळे…”
शिवसेनेने शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहरप्रमुख या पदावरुन हकालपट्टी केली आहे. भोईर यांना हटवल्यानंतर कल्याणच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी सचिन बासरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकातून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा >> “काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका
याआधी शिवसेनेने शिंदे गटातील संतोष बांगर आणि सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्यावर कठोर कारवाई केली होती. बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन तर तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं होतं. संतोष बांगर यांनी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान ऐनवेळी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. याआधी ते बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करताना भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच सावंत यांना पदावरुन हटवून मुंबईतील माजी नगरसेवक अनिल कोकळे यांच्याकडे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाजी जबाबदरी सोपवण्यात आली होती. तानाजी सावंत हे सोलापूर मतदारसंघातील भूम परंडा या मतदारसंघातून आमदार आहेत.
हेही वाचा >> “…तेव्हाच जल्लोष करू,” औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान
दरम्यान, शिवसेनेच्या या कारवाईनंतर आमदार विश्वनाथ भोईर यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, “कल्याण शहराचा शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवड केली आहे. मी निष्ठावान शिवैसनिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे शहरप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा असतील तर पक्षप्रमुख तो घेतील,” असे भोईर यापूर्वी म्हणाले होते.