कल्याण – मागील काही महिन्यांपासून दररोज कल्याण पूर्व भागातील वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला जातो. वीज पुरवठा खंडित केल्याची, झाल्याची कोणतीही कारणे महावितरण कर्मचारी वेळेवर देत नाहीत. आता तर कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. घरात बसुनही उष्णतेने शरीर भाजुन निघत आहे. अशा परिस्थितीत कल्याण पूर्वेतील वीज पुरवठा खंडित होत आहे. या सततच्या त्रासाला कंटाळुन सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महावितरणच्या कल्याण पूर्व टाटा पाॅवर येथील कार्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण पूर्वेतील महावितरणचा खंडित वीज पुरवठ्याचा खेळ थांबला नाही. कोणतीही पूर्व सूचना न देता यापुढे वीज पुरवठा खंडित केला तर शिवसेना ठाकरे गटाकडून नागरिकांना होणाऱ्या या त्रासामुळे महावितरणच्या कल्याण पूर्वेतील सर्व कार्यालयांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील आणि शिवसैनिकांनी महावितरणच्या कल्याण पूर्वेतील कार्यकारी अभियंता जगदीश बोडखे यांना दिला.
अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्वेत विजेचा लपंडाव सुरू आहे. वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होतो. यासंदर्भात महावितरण कार्यालयात संपर्क केला की त्यांचे नागरी सुविधा क्रमांक सतत व्यस्त असतात. अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन कामे करतात. वीज पुरवठा खंडित झाला की त्यांचा लॅपटाॅप, इंटरनेट यंत्रणा बंद पडते. त्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होतात. रुग्णालये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांमध्ये प्रश्न उपस्थित होतात. आता तर कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. एक क्षण वीज पुरवठा बंद झाला तरी घरात थांबणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा गेला की रुग्ण, वृध्द, लहान बाळे यांचे सर्वाधिक हाल होतात. थंड हवा म्हणून रात्रीच्या वेळेत दरवाजा उघडा ठेवला की घरात डास येतात. वीज पुरवठा खंडित करणारी छाटणी केलेली झाडे, फांद्या रस्तो रस्ती पडून आहेत. अशा अनेक कारणांमुळे कल्याण पूर्वेतील नागरिक महावितरणच्या कामाविषयी नाराज होते.महावितरणच्या सततच्या वीज पुरवठा खंडित विषयी वाढत्या तक्रारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून याप्रकरणी जाब विचारण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, शहरप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक महावितरण कार्यालयावर धडकले.
नागरिकांच्या वीज पुरवठ्याविषयीच्या समस्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता बोडखे यांना देण्यात आले. बोडखे यांनी सर्व समपदस्थ अधिकाऱ्यांना कल्याण पूर्व भागातील वीज पुरवठ्याबाबत काळजी घेण्याचे, नागरिकांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले. मोर्चात शहर संघटक मीना मळवे, संगीता गांधी, सुनिता दोसे, स्वाती चव्हाण, प्रतिमा धुमाळ, सुलोचना फेगडे, नितीन मोकल, पुरूषोत्तम चव्हाण, चंद्र प्रसाद, सखाराम भोसले, अशोक बोरकर सहभागी झाले होते.