बदलापूर शहरातील बहुतांश माजी नगरसेवकांचा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचे दावे केले जात होते. मात्र शनिवारी बदलापूर शहरातील शिवसेनेचे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. जे गेले त्यांना सोडून शहरात पुन्हा शिवसेना मजबूत करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी बदलापुरातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. यावेळी शिवसेना बदलापुरात लवकरच नवे पदाधिकारी नेमेल, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाणे जिल्हा मोठ्या प्रमाणावर उभा राहिला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रमुख सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेचे २१ माजी नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे संपूर्ण बदलापूर शिवसेनेचा पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जात होता. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नगरसेवक, अंबरनाथ पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यही होते. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र बदलापुरातील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये या सत्तांतर नाट्यावरून अस्वस्थता होती. अखेर शनिवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी जुने शिवसैनिक यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान गाठत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यात शिवसेनेचे अतुल रावराणे, माजी नगरसेवक शशिकांत पातकर, माजी उप नगराध्यक्ष प्रियाताई गवळी, गिरीश राणे, नरेश मेहर, प्रशांत पालांडे, विजय वैद्य, रामलू डोरापल्ली, विलास हंकारे, तेजस गंद्रे हे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी किशोर पाटील यांनी दिली आहे.

बदलापुरात लवकरच नव्या नेमणुका

शिवसेनेतून काही लोक गद्दारांसोबत गेले असतील. मात्र गेले त्यांचा विचार न करता बदलापुरात शिवसेना पुन्हा नव्याने उभी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केल्याची किशोर पाटील यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे बदलापूरचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीच एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आता बदलापुरात नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. लवकरच याबाबत घोषणा करू, असे आश्वासन बदलापुरातील शिवसैनिकांना दिल्याचे उपस्थित शिवसैनिकांनी सांगितले आहे.