बदलापूर शहरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी मंगळवारी झालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त आंदोलनादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी एका महिला पत्रकाराला वापरलेल्या अपशब्द प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. यात पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड ही सहभागी झाले होते. अखेर सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बदलापुरात आदर्श शाळेत झालेल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मंगळवारी नागरिकांनी उत्स्फूर्त असे उग्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आले होते. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे मंगळवारी सकाळच्या सुमारास आंदोलकांमध्ये आले असता तेथे वार्तांकन करत असलेल्या पत्रकार मोहिनी जाधव यांच्यात बातचीत झाली. यावेळी ‘तू अशा बातम्या देते, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, असे वक्तव्य वामन म्हात्रे यांनी केल्याचा आरोप मोहिनी जाधव यांनी केला होता. त्यानंतर जाधव यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली होती. मात्र याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला नव्हता. मंगळवारी झालेल्या बदलापुरातील उत्स्फूर्त आंदोलनावर बुधवारी सकाळी राजकीय पडसाद येत असतानाच म्हात्रे यांच्या वक्तव्यावरून वादही वाढला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा >>>तुम्हाला लाज वाटत नाही का, लाज… ठाण्यातील भाजप कार्यालयासमोर झळकले फलक
हा पदाधिकारी असा अर्वाच्च भाषेत बोलूच कशा शकतो, असा संताप अंधारे यांनी व्यक्त केला. वामन म्हात्रे याला अटक झालीच पाहिजे असेही अंधारे यावेळी म्हणाल्या. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ‘अशा वक्तव्य करणाऱ्याचे थोबाड फोडायचे होते’ असे वक्तव्य केले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वामन म्हात्रे यांचे विरुद्ध विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत मोहिनी जाधव यांची संपर्क केला असता तर होऊ शकला नाही. तर वामन म्हात्रे यांना संपर्क केला असता, ‘मी असे वक्तव्यच केले नाही. माझी बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे. मी कायदेशीर प्रक्रियेला घाबरणारा नाही किंवा पळून जाणार नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर पोलीस योग्य ती कारवाई करतील. मात्र असे वक्तव्य माझ्याकडून झालेले नाही. मी एक प्रामाणिक आणि सच्चा शिवसैनिक आहे. आमच्याकडे असे वक्तव्य करण्याचे संस्कार नाही’, असे म्हात्रे यांनी बोलताना सांगितले. तसेच अंधारे या शहरात चिमुकलीच्या अत्याचारावर मत मांडण्यासाठी आल्या होत्या की माझ्यावर गुन्हा दाखल करून राजकारण करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे असेही म्हात्रे म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd